रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे ते निवळी मार्गावर तरवळ येथील पोचरी फाट्याजवळ दुचाकीने रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले. संशयित स्वाराविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विलास मधूकर कांबळे (वय ४८, रा. नारशिंगे ता. जि. रत्नागिरी) असे संशयित स्वाराचे नाव आहे. हा अपघात रविवारी (ता. ८) सकाळी पाणे अकराच्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित स्वार विलास कांबळे हा आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच ०८ डीडब्ल्यू १६०१) घेऊन नारशिंगे येथून जाकादेवी बाजारपेठेच्या दिशेने जात होते. तरवळ येथील पोचरी फाट्याजवळ आल्यानंतर रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्यांनी दुचाकी हयगयीने निष्काळजीपणे चालवली. तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची खात्री न करता अचानक उजव्या बाजूला वळण घेतले. यावेळी जाकादेवी बाजारपेठेच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाला (एमएच ०८ बीक्यू २८६३) दुचाकीची धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार विलास कांबळे यांच्यासह मिथुन अशोक कांबळे (वय ३४, रा. विल्ये, ता. जि. रत्नागिरी) आणि रतन सुरेश रावणंग (वय ३७, रा. निवळी वरची रावणंगवाडी, ता. जि. रत्नागिरी) हे तिघे जखमी झाले. या प्रकरणी सहायक पोलिस फौजदार महेश टेमकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









