डॉ. बोल्डेंच्या बदलीनेे शल्य चिकित्सक पदाच्या वादाला पूर्णविराम

रत्नागिरी:- जिल्हा शल्य चिकित्सकांच्या पदभारावरून निर्माण झालेल्या वादावर पडदा पडला आहे. आरोग्य विभागाने राज्यातील 42 शल्य चिकित्सकांच्या बदल्या व नियुक्त्या केल्याने हा पेच सुटला आहे. शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांची सोलापूरला बदली झाली आहे. त्याच्या जागी प्रभारी असलेल्या डॉ. संघमित्रा फुले यांची रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून शासनाने अधिकृत नियुक्ती केली आहे.  

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांना गेल्या काही महिन्यांपासून पदापासून दूर ठेवण्यात आले होते. त्यांच्याजागी डॉ. संघमित्रा फुले यांची शल्य चिकित्सक म्हणून नियुक्ती केली होती. तर बोल्डे यांना कोरोनावर मात करणार्‍या रुग्णांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. तीन महिन्यापासून शल्य चिकित्सक पदाचा वाद सुरू आहे. डॉ. बोल्डे यांच्यावर काही आक्षेप असल्याने त्यांना पदापासून दूर ठेवण्यात आल्याची माहिती कालच उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. मात्र शल्य चिकित्सकांच्या पदभाराच्या वादामध्ये डॉक्टर संघटनेने उडी मागली. डॉ. बोल्डे यांच्याकडे शल्य चिकित्सक पद न दिल्यास यवतमाळ प्रमाणे आम्ही राजीनामे देऊ, असा इशारा मॅग्मो संघटनेने दिला.

संघटना विरुद्ध जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी असा वाद चिघळण्याची शक्यता होती. मात्र काल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील 42 शल्य चिकित्सकांच्या बदल्या आणि नियुक्ता केल्या. यामध्ये रत्नागिरीतील शल्य चिकित्सक पदाच्या तिघांचा समावेश आहे. डॉ. अशोक बोल्डे यांची सोलापूरला बदली करण्यात आली. तर प्रभारी शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांना रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून नियुक्ती दिली. तर डॉ. सुभाष चव्हाण यांची सातार्‍याला बदली करण्यात आली. आरोग्य विभागाने बदल्या केल्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक पदाच्या वादावर आपोआप पडदा पडला आहे.