लांजा:- मोटरसायकलला डुकराने जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आसगे तळवडे दाभोळे मार्गावर बेनी नदीच्या वळणाच्या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी घडली आहे . या घटनेत आसगे येथील दिनकर मांडवकर ही ५० वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, लांजा तालुक्यातील आसगे येथील दिनकर मांडवकर हे शेती क्षेत्राची आवड असणारे व्यक्तिमत्व आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते कलिंगडाची शेती करून चांगले प्रकारे उत्पन्न घेतात. दोन दिवसांपूर्वी सायंकाळच्या सुमारास कलिंगड घेऊन ते आसगेच्या दिशेने चालले होते. त्यांच्यापुढे कलिंगड भरलेला टेम्पो होता तर ते आपल्या मोटरसायकलने पाठीमागून येत होते. सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास आसगे रोडवर बेली नदीच्या वळणाच्या ठिकाणी आले असता अचानकपणे समोर आलेल्या डुकराने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की दिनकर मांडवकर हे मोटरसायकल वरून रस्त्याच्या बाजूला गटारात जाऊन पडले होते तर मोटरसायकल रस्त्यावर पडलेली होती.
याच दरम्याने पाठीमागून आलेल्या आसगे येथील रिक्षा व्यावसायिकाला दिनकर मांडवकर यांची मोटरसायकल रस्त्यात पडलेली आढळून आली. त्याने रिक्षा थांबवून आजूबाजूला पाहिले असता त्यांना दिनकर मांडवकर हे गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या बाजूला पडलेल्या आढळून आले. त्यानंतर त्यांच्या घरच्यांना याबाबची माहिती देण्यात आली आणि त्यानंतर जखमी झालेल्या दिनकर मांडवकर यांना रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एकीकडे वन्य प्राण्यांना ठार मारले तर गुन्हा दाखल करणारे वनविभाग, वन्य प्राणी डुकराच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दिनकर मांडवकर यांना नुकसान भरपाई देणार का? असा प्रश्न आसगे मांडवकरवाडी येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.









