रत्नागिरी:- एसटी बसेसना लागणाऱ्या डीझेल उपलब्ध न झाल्याने सोमवारी दुपारपासूनच रत्नागिरी बस स्थानकावरील शहरी आणि ग्रामीण वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. डिझेल अभावी शेकडो बस गाड्या आणि हजारो प्रवासी राहाटाघर बस स्थानक आणि अन्य ठिकाणी खोळंबले. पहिल्याच श्रावणी सोमवारी बाजारातही ग्रामीण भागातून आलेल्याची गर्दी होती तर विद्यार्थी, नोकरदार यांच्यासह महिलाही पावसाला थोडी उघडीप मिळाल्याने बाजारात मोठ्या संख्येने आलेल्या होत्या. मात्र दुपारी १२ वाजल्यापासून रत्नागिरी बस स्थानकातील बसेस स्थानकावरच खोळंबून राहिल्या होत्या.
संध्याकाळ झाली तरीही शहरी किंवा ग्रामीण भागातील बसेस न सुटल्याने प्रचंड गोंधळ उडाला. अनेक बस बस स्थानकात उभ्या होत्या. मात्र, त्या का सोडल्या जात नाही याचे समर्पक उत्तर देण्यात येत नसल्याने प्रवासी संतप्त झाले. बसेस दिवसभर स्थानकात उभ्या राहिल्याने अनेक शालेय विद्यार्थी, नोकरदार अडकले होते. संध्यकाळी ही गर्दी वाढतच गेली. सोमवारी संध्याकाळ पर्यंत एस्टी चे अधिकारी नॉट रीचेबल होते.
सोमवारी सायंकाळी उशिरा बोलताना विभाग नियंत्रक बोरसे म्हणाले कि दुपारी एसटी डेपोतील डीझेल पंप तांत्रिक दोषामुळे बंद पडला आणि त्यामुळे बसेसना डीझेल उपलब्ध करता आले नाही आणि ही अडचण निर्माण झाली. मात्र रात्री पंप सुरु झाल्यानंतर इंधनाचा प्रश्न सुटला असून गाड्या मार्गस्थ झाल्या. डीझेल भरण्यासाठी माळनाका येथे बसेसच्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या. संध्याकाळी वाहतूक पूर्ववत झाली असली तरीही मात्र संपूर्ण प्रकारांत प्रवाशांना विशेषतः विध्यार्थी, स्त्रिया आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला याबद्दल संतप्त प्रतिक्रिया देण्यात येत आहेत.









