चिपळूण पावर हाऊसजवळ अपघात
चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण पावर हाऊसजवळ गतिरोधक ओलांडत असताना एका भरधाव बारा चाकी डंपरने एर्टिगाला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ ऑक्टोबर रोजी रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण पावर हाऊस (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे हा अपघात घडला. या प्रकरणी फिर्यादी संकेत शिवाजी गुरव (वय ३५ वर्षे, व्यवसाय-नोकरी, रा. १६, कॉस्टा ब्लॅन्का, तिसरा मजला, पौर्णिमा टॉकीजजवळ, मुरबाड रोड, कल्याण पश्चिम, मुंबई) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी संकेत गुरव हे १७ ऑक्टोबर रोजी रात्री २:५५ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरून जात असताना चिपळूण पावर हाऊस येथील गतिरोधक ओलांडत होते. त्यावेळी भारत बेझ कंपनीची बारा चाकी गाडी (क्र. एमएच १२ एलटी-२०५७) वरील आरोपी चालक लालचंद कुंजु महातो (सध्या रा. रत्नागिरी मिरकरवाडा, मुळ रा. तोफचाची, धनबाद, झारखंड) याने आपले ताब्यातील वाहन अतिशय वेगात आणि बेदरकारपणे चालवून एर्टिगा कारला (क्र. एमएच-०५-इक्यू-३५२४) पाठीमागून जोरदार धडक दिली.
या अपघातात गाडीचे नुकसान झाले असून, कारमधील श्वेता शिवाजी गुरव आणि शिवाजी बाबाजी गुरव हे दोघेजण जखमी झाले आहेत.
या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३२३/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५(अ) तसेच मोटार वाहन कायदा (मो.वा.का.) कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.









