रत्नागिरी शिक्षक भरती; अहवालानंतरच होणार निर्णय!
रत्नागिरी:- सन २०१८-१९ मधील गाजलेल्या टीईटी घोटाळ्यातील १३ उमेदवारांनी २०२५-२६ च्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी अर्ज केल्याचा संशय असून, या १३ जणांची नावे पडताळणीसाठी सायबर क्राईम, पुणे यांच्याकडे पाठवण्यात आली आहेत. सायबरचा अहवाल आल्यानंतरच या उमेदवारांना नियुक्ती द्यायची की नाही, याचा निर्णय होणार असल्याने या प्रकरणाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ४७८ जागांसाठी पवित्र पोर्टलमार्फत झालेल्या भरतीमध्ये तीन टप्प्यात कागदपत्र पडताळणी पार पडली. त्यापैकी ४५७ उमेदवार हजर झाले, तर २१ गैरहजर राहिले. मात्र पडताळणी होऊनही अद्याप समुपदेशनाची प्रक्रिया झालेली नाही. दरम्यान, या ४७८ उमेदवारांपैकी १३ जण टीईटी घोटाळ्यातील संशयित असल्याचा मुद्दा समोर आला आहे.
हे १३ जण गैरहजर उमेदवारांपैकी आहेत की हजर झालेल्या उमेदवारांपैकी आहेत, याची माहिती अजून स्पष्ट करण्यात आलेली नाही. मात्र १३ जणांची नावे सायबर क्राईम विभागाकडे पाठवण्यात आली आहेत. त्यांचा अहवाल आता निर्णायक ठरणार आहे, असे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
२०१८-१९ टीईटी घोटाळ्यात बनावट प्रमाणपत्राद्वारे पात्र ठरलेल्या १३ उमेदवारांनी पुन्हा अर्ज केला आहे. या सर्वांची नावे, टीईटी क्रमांक आणि आधार तपशील सायबर क्राईम, पुणे यांना पाठवले आहेत. ते १३ जण अहवालात अपात्र ठरल्यास त्यांना भरतीतून वगळण्यात येणार आहे. हा अहवाल दोन-तीन दिवसात अपेक्षित आहे.
४७८ जागांसाठी ४५७ उमेदवारांची पडताळणी पूर्ण झाली आहे. २१ गैरहजर आहेत. पडताळणी होऊन १० दिवस उलटले तरी समुपदेशन झाले नाही. त्यामुळे शाळा आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पुढील आठवड्यात समुपदेशन होणार असून ई-मेलद्वारे कळवले जाणार आहे.
दोन वर्षांपूर्वीच्या शिक्षक भरतीच्या वेळी टीईटी घोटाळ्यातील नऊ शिक्षकांना नियुक्ती देण्यास रत्नागिरी जिल्हा परिषदेने नकार दिला होता. पुणे पोलिसांच्या अहवालात त्या नऊ शिक्षकांवर गुन्हे दाखल झाल्याचे त्यावेळी स्पष्ट झाल्याने त्यांना जिल्हा परिषदेचे दार कायमचे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.









