Monday, August 17, 2026
spot_img
Home रत्नागिरी जे.के. फाईल येथे अज्ञात मोटारसायकलच्या धडकेत स्कुटरस्वार जखमी; चालक फरार

जे.के. फाईल येथे अज्ञात मोटारसायकलच्या धडकेत स्कुटरस्वार जखमी; चालक फरार

एक महिन्यानंतर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- हातखंबा ते साळवी स्टॉप मार्गावर जे.के. फाईलसमोरील एल.जी. शोरूमजवळ एका अज्ञात मोटारसायकलस्वाराने स्कुटरला धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात स्कुटरस्वार जखमी झाले असून, धडक दिल्यानंतर कोणतीही मदत न करता किंवा पोलिसांना खबर न देता आरोपी चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना १८ जुलै रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास हातखंबा ते साळवी स्टॉप रोड, जे.के. फाईल येथील एल.जी. शोरूमसमोर घडली. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राकेश वसंत तटकरी (पोहेकॉ/६६४, नेमणूक रत्नागिरी शहर पोलीस ठाणे) यांनी मोटार अपघात रजि.नं. ३८/२०२६ च्या चौकशीअंती हा गुन्हा नोंदवला आहे.

खबर देणारे चंद्रशेखर सखाराम जोशी (वय ६२ वर्षे, रा. घर नं. १०३०, धनसंपदा, जे. के. फाईल समोर, रत्नागिरी) हे १८ जुलै रोजी आपल्या ताब्यातील एक्सेस स्कुटर (क्र. एम.एच. ०८/बी.जी. ७८३४) ने प्रवास करत होते. ते जे.के. फाईल ते साळवी स्टॉप मार्गाने जात असताना, एल.जी. शोरूमसमोर आले असता मागून आलेल्या एका अज्ञात मोटारसायकलच्या चालकाने आपली गाडी हयगईने, बेदरकारपणे आणि इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशी चालवून त्यांच्या स्कुटरला मागून जोरदार धडक दिली.

या अपघातामध्ये चंद्रशेखर जोशी हे आपल्या स्कुटरसह रस्त्यावर पडल्याने त्यांच्या खांद्याला दुखापत झाली. अपघात घडल्यानंतर आरोपी चालकाने घटनास्थळी न थांबता किंवा अपघाताची कोणतीही माहिती न देता तिथून पळ काढला.

या प्रकरणी अज्ञात मोटारसायकल चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८१, १२५(अ), मोटर वाहन कायदा कलम १८४, १३४(ब)/१७७ तसेच भा.द.वि. कलम २७९, ३३७, ३३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.