रत्नागिरी:- उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मतदार संघातील सर्वात जुन्या कंपन्यांपैकी एक असलेल्या जे. के. फाईल्स इंजिनिअरींग कंपनी रत्नागिरीतून गाशा गुंडाळण्याची तयारी करु लागली असल्याचे चित्र दिसत आहे. कंपनीने रत्नागिरीतील तीन डिपार्टमेंट बंद करुन तेथील कामगारांना उर्वरीत चार डिपार्टमेंटमध्ये हलवले आहे. शुक्रवारी संचालक मंडळाने रत्नागिरीत येऊन कामगारांना सात लाख रुपये देण्याचे आमिष दाखवल्याने कामगारांनामध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. कंपनी बंद झाल्यास कायमस्वरुपी असलेल्या सुमारे तिनशेहून अधिक कर्मचार्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे.
रत्नागिरी येथील मिरजोळे एमआयडीसीमध्ये सुमारे पंचेचाळीस वर्षापूर्वी 1978मध्ये जे. के. फाईल्स इंजिनिअरींग ही कंपनी सुरु झाली. मिर्या-नागपूर हायवे लगत असणार्या या कंपनीत रत्नागिरीतील शेकडोजणांनी नोकरी करुन आपला संसार उभा केला. आजही सुमारे तिनशे ते चारशे कामगार कायमस्वरुपी या ठिकाणी कामाला आहेत. या कंपनीमध्ये पूर्वी सात डिपार्टमेंटमध्ये काम चालत होते. फाईल्स तयार करण्याचे काम त्यानंतर मिरजोळे एमआयडीसीत अन्य ठिकाणी देण्यात येत होते. काळांतराने रत्नागिरीत बाहेर देण्यात येणारी काम बंद झाले.
परंतु रत्नागिरीतील कंपनीमध्ये असणारे ठेकेदारांचे कामगारही हळूहळू कमी करण्यात येऊ लागले. मालाला उठाव नसल्याचे कारण देत संचालक मंडळाने कामही कमी केले. याचवेळी चिपळूण खडपोलीतील कामे मात्र वाढली होती.
सध्या रत्नागिरीतील जे. के. फाईल्स कंपनीत असणार्या फोर्जिंग, ग्रॅडींग, कटींग, हार्डींग, निडल, वेअरहाऊस, पॅकींग यातील निडल, वेअरहाऊस, पॅकींग ही डिपार्टमेंट बंद करण्यात आली आहेत. येथील कामगारांना फोर्जिंग, ग्रॅडींग, कटींग व हार्डींग डिपार्टमेंटमध्ये हलवलण्यात आले आहे. तीन शिपमध्ये चालणारे या कंपनीतील काम सध्या सकाळच्या एकाच शिपमध्ये सुरु ठेवण्यात आले आहे.
शुक्रवारी जे.के.फाईल्स कंपनीचे काही संचालक रत्नागिरीत आले होते. त्यांनी कामगारांशी संवाद साधला. यावेळी मालाचा उठाव होत नाही व कंपनीला परवडत नसल्याचे सांगितले. कंपनी कामगारांना प्रत्येकी सात लाख व अन्य योजनांचा लाभ देण्यास तयार असल्याचे आमिष दाखवले. मात्र कामगारांकडून फारसा प्रतिसाद त्यांना मिळाला नाही. परंतु कंपनी बंद करण्याच्या हालचालींना वेग आला असल्याचे कामगारांकडून सांगितले जात आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मतदार संघातील हा प्रकल्प आता बंद होणार की सुरु राहणार, मंत्री महोदय यात काय मध्यस्थी करणार याकडे कामगारांचे लक्ष लागून राहिले आहे.