Friday, September 11, 2026
spot_img
Home रत्नागिरी जेके फाईल्स ते गद्रे मरीन रस्त्याचे होणार चौपदरीकरण

जेके फाईल्स ते गद्रे मरीन रस्त्याचे होणार चौपदरीकरण

तब्बल 24 कोटींचा निधी मंजूर

रत्‍नागिरी:- शहरानजीकच्‍या मिरजोळे एमआयडीसीतील जे.के. फाईल्‍स ते गद्रे मरीनपर्यंतच्‍या रस्‍त्‍याच्‍या स्‍थितीबाबत ओरड होत असताना, हायवेपासून एमआयडीसीत जाणारा हा मुख्‍य रस्‍ता आता चौपदरीकरण केला जाणार आहे. यासाठी सुमारे 24 कोटीचा निधी मंजूर झाला असून या चौपदरीकरणाच्‍या पहिल्‍या टप्‍प्‍यातील कामाला सुरुवात झाली आहे. मार्च 2027 पर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे.

शहरालगतच्‍या मिरजोळे एमआयडीसीमध्‍ये जाण्‍यासाठी जे.के. फाईल्‍स येथून मुख्‍य रस्‍ता असून, पाऊस व अवजड वाहतुकीमुळे येथील रस्‍त्‍याला खड्डे पडले आहेत. याच्‍या डागडुजीबाबत नागरिकांकडून मागणी होत आहे. मात्र जे.फे. फाईल्‍स ते गद्रे मरीन कंपनीपर्यत या रस्‍त्‍याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. सुमारे अठराशे मीटरचा हा रस्‍ता असून 24 कोटी रुपये खर्च करुन हे काम होत आहे. या कामाला पहिल्‍या टप्‍प्‍यात सुरुवातही झाली असून, रस्‍त्‍याच्‍या बाजूने पाण्‍याची पाईपलाईन व वीज वाहिन्‍या हलवण्‍याचे काम हाती घेण्‍यात आले आहे.
चौपदरीकरण करताना रस्‍त्‍याच्‍या मध्‍यभागी डिव्‍हाडरवरती आकर्षक झाडे लावली जाणार असून, विद्युत दिवेही लावण्‍यात येणार आहेत. काँक्रीटकरणासह दोन्‍ही बाजुने फुटपाथ, गटारे आदी कामेही होणार आहेत.

जागतिक पातळीवर निर्यात करणारे गद्रे मरीनसह अनेक मरीन कंपन्‍यांची वाहतूक या मार्गावरुन होत असते. तटरक्षक दलासह या मार्गाजवळच इंजिनिअरींग व पदवी महाविद्यालयही आहे. नव्‍याने होऊ घातलेले रत्‍नागिरी विमानतळासाठीही हा शहरात येण्‍यासाठी किंवा रत्‍नागिरीतून बाहेर पडण्‍यासाठी हायवेला जाण्‍यासाठी मुख्‍यमार्ग असणार आहे. त्‍यामुळे या रस्‍त्‍याचे चौपदरीकरण करतानाच तो आकर्षक दिसावा यासाठी एमआयडीसीकडून प्रयत्‍न सुरु आहेत. हा रस्‍ता मार्च 2027 पर्यत पूर्ण करण्‍याच्‍या दृष्‍टीने ठेकेदार कंपनीकडून प्रयत्‍न सुरु आहेत. पावसाळा संपल्‍यानंतर या रस्‍त्‍याच्‍या कामाला अधिक गती मिळणार आहे.

राज्‍याचे उद्योगमंत्री व जिल्‍ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्‍ह्यातील एमआयडीसीमधील रस्‍ते चांगले करण्‍याकडे लक्ष वेधले आहेत. मिरजोळे एमआयडीसीतील जवळपास 90 टक्‍के रस्‍ते वाहतुकीला सुस्‍थितीत आहेत. त्‍यामुळे हा नवीन रस्‍ता स्‍मार्टसिटी व पर्यटनदृष्‍ट्या विकसित रत्‍नागिरीसाठी साजेसा व्‍हावा यासाठी जे. के. फाईल्‍स ते गद्रे मरीनपर्यतच्‍या रस्‍ता तयार केला जाणार आहे.