जि. प. तील बदल्यांसाठी दहा दिवसांची मुदतवाढ

राज्य शासनाचा नवा आदेश

रत्नागिरी:- शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेमध्ये अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्या 31 जुलैपूर्वी होणार होत्या. यासाठी समुपदेशन कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला होता. मात्र शासनाने त्यामध्ये बदल करून या बदल्या 10 ऑगस्टपर्यंत करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेला दिल्या आहेत. यामुळे या बदल्यांना आता मुदतवाढ मिळाली आहे.

गेल्या काही वर्षांपासून कर्मचार्‍यांच्या बदल्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेष करून गुरूजींच्या बदल्यांना सर्वाधिक महत्त्व आले आहे. सध्या बदल्या हा कर्मचार्‍यांसह अधिकारीवर्ग यांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. बदल्यांमध्ये राजकारण येत असल्याने नेहमीच चर्चेचा विषय बनतो. अनेकवेळा बदल्या राजकीय पदाधिकार्‍यांसाठी प्रतिष्ठेचा होतो. अलिकडच्या काळात बदल्यांमध्ये अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यात संघर्ष पाहायला मिळतो.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जुलै महिन्यात सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यास मुख्यमंत्र्यांचा विरोध होता. मात्र, शरद पवार यांनी वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर एकूण बदल्यांच्या 15 टक्के बदल्या करण्यास मुख्यमंत्री सहमत झाले. त्यामुळे अर्थ खात्याच्या सहमतीने सामान्य प्रशासन विभागाने 15 टक्के सरकारी अधिकार्‍यांच्या व कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्याचे आदेश जारी केले आहेत. या बदल्या 31 जुलैपर्यंत कराव्यात, असे म्हटले होते.
त्यानुसार जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या अंमलबजावणीसाठी हालचाली सुरु झाल्या. बदलीसाठी पात्र असलेल्यांची यादी तयार करुन त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू होती. समुपदेशनाचे वेळापत्रकही जाहीर झाले होते. 27 जुलैपासून हे समुपदेशन होणार होते.

शासनाने मात्र 31 जुलैऐवजी आता 10 ऑगस्टपर्यंत बदल्या कराव्यात, असे नवीन आदेश काढले आहेत. कोरोनाचे वाढते रूग्ण पाहता या बदल्यांना मुदतवाढ दिल्याचे शासनाने या आदेशात म्हटले आहे. असे असले तरी समुपदेशन हे ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार की नाही याबाबत जि. प. प्रशासनाने अजून कोणीतीही भूमिका जाहीर केलेली नाही.