रत्नागिरी:- जिल्ह्यात शनिवारी परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत असून, यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे आज कार्तिकी एकादशी असल्याने रत्नागिरीतील विठ्ठल-रखुमाई मंदिर परिसरात भाविकांची होणारी नेहमीची गद आणि यात्रेचा उत्साह या पावसामुळे कमी झाल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम सुरू असले तरी, पावसाच्या सततच्या हजेरीमुळे भाविकांची गैरसोय झाली.
शनिवारी दिवसभरात रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात आज सरासरी 45.84 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, एकूण पाऊस 412.6 मि.मी. इतका पडला आहे. तालुक्यांनुसार पावसाच्या प्रमाणात मोठी तफावत दिसून येत आहे. लांजा तालुक्यात सर्वाधिक 113.80 मि.मी. पावसाची नोंद झाली, ज्यामुळे हा तालुका सर्वाधिक प्रभावित झाला. त्याखालोखाल गुहागरमध्ये 68.20 मि.मी. आणि रत्नागिरी शहरात 52.00 मि.मी. पाऊस झाला आहे. चिपळूण तालुक्यात सर्वात कमी 26.30 मि.मी. पावसाची नोंद झाली, तर मंडणगडमध्ये 18.30 मि.मी., दापोलीत 28.50 मि.मी., खेडमध्ये 32.00 मि.मी., संगमेश्वरमध्ये 36.40 मि.मी. आणि राजापूरमध्ये 37.10 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
अवकाळी आणि मुसळधार पाऊस शेतकऱ्यांसाठी मोठे संकट घेऊन आला आहे. जिल्ह्यात भात कापणीचे काम सुरू असतानाच पावसाने हजेरी लावल्यामुळे कापणी झालेले भात शेतात भिजून सडून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे आधीच जिल्ह्यातील भात पिकांचे मोठे नुकसान झाले होते. मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण आणि संगमेश्वरसह सर्वच तालुक्यांमध्ये कापणी केलेले भात सुरक्षित ठेवण्याची धडपड शेतकरी करत आहेत. काही ठिकाणी भात पिके आडवी झाली असून, हातातोंडाशी आलेला घास या परतीच्या पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत असल्याने ग्रामीण भागातील रस्ते जलमय झाले आहेत. काही ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून, कामावर जाणारे नागरिक आणि पर्यटकांची मोठी गैरसोय झाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.









