2 लाख 46 हजार जणांना पहिला तर 63 हजार जणांना दुसरा डोस
रत्नागिरी:- लसीकरण सुरु झाल्यानंतर सुरुवातीला दुर्लक्ष करणार्या नागरिकांची गेल्या दोन महिन्यात रुग्ण संख्येचा विस्फोट झाल्यामुळे लसीकरणासाठी धावपळ उडाली. जिल्ह्यात आतापर्यत 3 लाख 8,944 डोस देण्यात आले आहेत. पहिला डोस 2 लाख 46 हजार 10 जणांनी पहिला डोस घेतला असला तरी दोन्ही डोसचा कोर्स फक्त 62 हजार 934 नागरिकांनीच पूर्ण केला आहे. प्रशासनाने सध्या पहिल्या व दुसर्या डोससाठी आळीपाळीने मोहीम राबवली आहे.
जिल्ह्यामध्ये एप्रिल व महिन्यात कोरोनाची साथ मोठ्याप्रमाणात पसरली आहे. तब्बल 25 हजारहून अधिक रुग्ण दोन महिन्यात जिल्ह्यात सापडले असून सातशेहून अधिकजणांचा मृत्यू दोन महिन्यात कोरोनाने झाला आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांकडून लस घेण्यात टाळाटाळ करण्यात येत होती. त्यामुळे फ्रंटलाईनला काम करणार्या पोलीस, महसूल व आरोग्य कर्मचार्यांची लसीकरण मोहीम राबवून जागृती करण्यात आली. त्यानंतर 60 वर्षावरील व 45 वर्षावरील नागरिकांसाठी मोहीम हाती घण्यात आली होती. परंतु त्याकडेही दुर्लक्षच झाले होते. मागील दोन महिन्यात रुग्ण संख्येचा विस्फोट झाल्यावर मात्र नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जागृती निर्माण झाली आणि लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ लागली. अगदी केंद्रावरील डोसही कमी पडू लागले. अनेक वेळा ऑनलाईन नोंदणीही होत नव्हती. लसीकरणात येणार्या अडचणी जाणत जिल्हा प्रशासनाने लसीकरण केंद्रांमध्ये वाढ केली. अगदी शहर व ग्रामीण भाग निर्माण करण्यात आले. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांवरही लसीकरण सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे सुरुवातीला होणारी गर्दी आता कमी होऊ लागली आहे.
जिल्ह्यात 60 वर्षावरील 83,052 जणांनी पहिला डोस घेतला आहे तर 22 हजार 212जणांनी दुसरा डोस घेतला आहे. 45 ते 60 वर्षापर्यंत 83 हजार 653 जणांनी पहिला डोस तर 12 हजार 136जणांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वयोगटातील 26 हजार 200 लोकांनी डोस घेतला आहे. फ्रंटलाईन वर्करमध्ये 35 हजार 239 जणांनी पहिला तर 16 हजार 520 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. आरोग्य सेवेत काम करणार्या 17 हजार 866 जणांनी पहिला तर 12 हजार 66 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
यात कोव्हीशील्डचा पहिला डोस 1 लाख 99 हजार 292 जणांनी तर दुसरा डोस 40 हजार 319जणांनी घेतला आहे. कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस 46 हजार 718 तर दुसरा डोस 22 हजार 615 जणांनी घेतला आहे. जिल्ह्यात लसीकरण मोहीम वेगाने सुरु असून महिन्याच्या अखेरीपर्यत 60 वर्षावरील नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण व 45 वर्षावरील जास्तीतजास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.