रत्नागिरी:- नागरिकांना आरोग्याच्या मुलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाने ‘हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजना सुरू केली. रत्नागिरी जिल्ह्यात ९ ठिकाणी दवाखाने सुरू झाले आहेत. आतापर्यंत ओपीडाला १६९ जणांची नोंद झाली असून १६ जणांचे नमूने तपासण्यासाठी घेण्यात आले आहेत. २ गरोदर मातांनी येथे तपासणी केली.
पंधराव्या वित्त आयोगांतर्गत नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे टप्प्याटप्प्याने रुपांतर “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” केंद्रामध्ये करण्यात येत आहे. ‘आपला दवाखाना’मध्ये दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्व आरोग्य सुविधा मोफत दिल्या जात आहेत. हे दवाखाने शहरी भागात सूरु करण्यात आले आहेत. “आपला दवाखाना” हा उपक्रम यशस्वी करून सामान्यातल्या सामान्य गरजू घटकाला या उपक्रमाचा तत्परतेने लाभ मिळेल, यासाठी प्रयत्न करूया, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी आरोग्य विभागाला सुचित केले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील केंद्रांवर १६९ रूग्णांनी जाऊन तपासणी केली आहे. या योजनेद्वारे मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी यासह रक्त चाचण्यांची सेवा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय क्ष-किरण (एक्स-रे), सोनोग्राफी इत्यादी चाचण्याकरिता पॅनलवरील डायग्नोस्टिक केंद्राद्वारे स्वस्त दरात संबंधित वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष तज्ञांच्या सेवा देखील उपलब्ध होतील. ह्यात ओपीडी स्वरूपात सेवा देण्यात येणार आहे. ‘आपला दवाखान्या’त बाह्य रुग्णसेवा, मोफत औषधोपचार, मोफत प्रयोगशाळा तपासणी, टेली कन्सल्टेशन, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण या सेवा देण्यात येणार आहेत. तसेच या व्यतिरिक्त महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, आवश्यकतेनुसार विशेष संदर्भ सेवा, योगा व व्यायाम बाबतचे प्रात्यक्षिक देखील करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली आहे.









