आंबा, काजू, नारळ व सुपारी उत्पादकांना मिळणार संरक्षण
रत्नागिरी:- बदलत्या हवामानामुळे फळपिकांच्या उत्पादनात होणारी घट आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सोसावे लागणारे आर्थिक नुकसान लक्षात घेऊन कृषी विभागामार्फत जिल्ह्यात हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. सन २०२६-२७ या वर्षासाठी जिल्ह्यातील आंबा, काजू, नारळ आणि सुपारी या चार प्रमुख फळपिकांचा या योजनेत समावेश करण्यात आला असून, जिल्ह्यातील फळपीक उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने यात सहभागी होऊन आपल्या बागांना विमा संरक्षण मिळवून द्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व कृषी विभागाने शासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे यावर्षी आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आंबा पिकाचा विमा संरक्षण कालावधी १५ मे ऐवजी आता ३१ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांचा विमा हप्ता हेक्टरी १३ हजार ६०० रुपयांवरून थेट ८ हजार ५०० रुपये इतका कमी करण्यात आला आहे.
पिकनिहाय विमा संरक्षित रक्कम व शेतकरी हप्ता निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये आंबा संरक्षित रक्कम १,७०,००० शेतकरी हप्ता ८,५००, काजू साठी संरक्षित रक्कम १,२०,००० शेतकरी हप्ता ६,०००, नारळ संरक्षित रक्कम १,७०,००० शेतकरी हप्ता ८,५०० आणि सुपारी संरक्षित रक्कम १,००,००० शेतकरी हप्ता ५,००० इतका आहे.
जिल्ह्यात बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत ही योजना राबविली जात आहे. अधिसूचित ८३ महसूल मंडळांमध्ये आंबा व काजूसाठी, ५३ मंडळांमध्ये नारळासाठी, तर २३ महसूल मंडळांमध्ये सुपारीसाठी हे विमा संरक्षण लागू राहील. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात. अधिसूचित हवामान केंद्रांवर नोंदवले जाणारे कमाल-किमान तापमान, पाऊस, आर्द्रता आणि वाऱ्याचा वेग हे घटक निर्धारित निकषांपेक्षा प्रतिकूल ठरल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई थेट दिली जाईल.
विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे ‘ॲग्रीस्टॅक’ अंतर्गत फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांनी ‘ई-पीक पाहणी’ द्वारे आपल्या फळपिकाची नोंद करणे बंधनकारक आहे.
शेतकरी आपले सरकार सेवा केंद्र, बँक किंवा www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन विमा हप्ता भरू शकतात. अर्जासोबत फळबागेचा जिओ-टॅगिंग असलेला फोटो पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य आहे.
नारळ व सुपारी पिकांसाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ असून आंबा व काजू पिकांसाठी ३० नोव्हेंबर २०२६ ही मुदत आहे. शेतकऱ्यांनी अखेरच्या दिवसांची वाट न पाहता तातडीने नोंदणी पूर्ण करावी. योजनेच्या अधिक माहितीसाठी गावातील कृषी सहायक अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी प्रतिकेश शिगवण (मोबा. ९८८१९६७२३३) यांच्याशी संपर्क साधता येईल, असे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.









