जिल्ह्यात सायंकाळनंतर पुन्हा परतीच्या पावसाची हजेरी

रत्नागिरी:- परतीच्या पावसाने आपली हजेरी कायम ठेवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार बुधवारी सायंकाळनंतर पावसाला सुरुवात झाली. रत्नागिरी शहरात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. तर काही भागात जोरदार पावस बरसला.

परतीच्या पावसाची हजेरी मागील काही दिवसांपासून सुरूच आहे. मंगळवारी सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. रात्रभर कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच होता. बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र किनारपट्टी भागात वाऱ्यांचा जोर कायम होता. वादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांनी सावधगिरी बाळगत आपल्या नौका बंदरवरच उभ्या ठेवल्या होत्या. यामुळे बुधवार असून देखील मासळी बाजारात शुकशुकाट होता.

बुधवारी सायंकाळनंतर जिल्हाभरात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. सुरुवातीला पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. ग्रामीण भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अद्यापही अनेक भागात भातशेती कापणीची कामे प्रलंबित आहेत. परतीच्या पावसाचा मुक्काम लांबल्याने शेतकरी राजा चिंतेत आहे.