पर्यटन, संरक्षण, ऊर्जा, प्रकल्पांना देखील चालना: ना. सामंत
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीला प्रचंड गती देणाऱ्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. कोकणच्या निसर्गसंपन्न किनारपट्टीचा आणि भौगोलिक परिस्थितीचा वापर करून जिल्ह्यात पर्यटन, संरक्षण, ऊर्जा आणि स्टील क्षेत्राशी संबंधित महाप्रकल्प आणण्याचा मोठा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी साडेसात हजार कोटींची गुंतवणूक करून ग्रीन स्टील प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यातील एक प्रकल्प रत्नागिरीत तर एक प्रकल्प राजापूर तालुक्यात उभारण्यात येणार असल्याची माहिती ना. सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या सर्व प्रकल्पांमध्ये जिल्ह्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा ठरणारा ७,५०० कोटी रुपयांचा ‘ग्रीन स्टील’ महाप्रकल्प लवकरच सुरू होत आहे. स्टील क्षेत्रातील नामांकित उद्योजकांनी रत्नागिरीत ही गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली असून, या प्रकल्पाचे दोन भाग असणार आहेत. यातील एक प्रकल्प राजापूर येथे तर दुसरा प्रकल्प स्वतः रत्नागिरीमध्ये उभारला जाणार आहे. हा प्रकल्प जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाचा मुख्य कणा ठरणार आहे.
औद्योगिक विकासासोबतच रत्नागिरीच्या पर्यटनाला आधुनिकतेची नवी भरारी देण्यासाठी ‘सी-प्लेन’ सेवा सुरू करण्यात येत आहे. पुढील वर्षभरात ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे उद्दिष्ट असून, संरक्षण क्षेत्रात मोठे नाव असलेल्या ‘गणेश शिपयार्ड’च्या माध्यमातून हा प्रकल्प राबवला जाण्याची शक्यता आहे. या जलद आणि आकर्षक हवाई प्रवासाच्या सुविधेमुळे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करणे शक्य होणार आहे.
तसेच, रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्याचा वापर करून वाटद किंवा त्याच्या आसपासच्या परिसरात ‘डिफेन्स शिपयार्ड’ म्हणजेच संरक्षण जहाज बांधणी केंद्र उभारण्यात येणार आहे. येथे संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक असणारी अत्याधुनिक यंत्रणा व सिस्टीम तयार केली जाईल. यासोबतच, सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि संपूर्ण जिल्ह्यासाठी ‘गेम चेंजर’ ठरणारा सीएनजी प्रकल्पही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे स्थानिक लोकांना पर्यावरणपूरक आणि स्वस्त इंधनाचा उत्तम पर्याय उपलब्ध होईल.
दरम्यान, पूर्वी मंजूर झालेल्या ‘व्हीआयटी सेमीकंडक्टर’ प्रकल्पाबाबत बोलताना उद्योगमंत्र्यांनी सांगितले की, अमेरिकेसोबत झालेल्या काही करारांमुळे या प्रकल्पाला काहीसा उशीर झाला आहे. तसेच या प्रकल्पाचे एकूण मूल्य जे आधी ३८,००० कोटी रुपये होते, ते आता काही प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे या प्रकल्पाची अडचण लक्षात घेता, त्यांना आवश्यक तेवढीच जागा दिली जाईल आणि उर्वरित शिल्लक जागा इतर नवीन उद्योगांना उपलब्ध करून देण्यात येईल, जेणेकरून रत्नागिरीत नवीन उद्योगांना अधिक वाव मिळेल. एकूणच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलेले हे निर्णय रत्नागिरीच्या विकासाला सोन्याचे दिवस आणणारे ठरणार आहेत.









