रत्नागिरी:- जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मान्सूपूर्व पावसाने आपली हजेरी कायम ठेवली. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरी प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात 21 मे 23 मे या कालावधीत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या कालावधीत जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह व वादळीवाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. तसेच या कालावधीत ताशी 50 ते 60 किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार मंगळवारी दुपारनंतर जिल्ह्याला मान्सूनपूर्व वादळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मंगळवारी सायंकाळनंतर पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढला होता. बुधवारी सकाळच्या सुमारास पावसाने काही प्रमाणात उसंत घेतली होती. मात्र मंगळवारी कोसळलेल्या मुसळधार पावसाचे परिणाम बुधवारी दिसून आले. मान्सूनपूर्व वादळी पावसाने जिल्ह्याच्या अनेक भागात प्रचंड नासाडी केली. मंगळवार पासून बुधवारी सकाळ पर्यंत जिल्ह्यात 44 च्या सरासरीने 397 मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. यात मंडणगड तालुक्यात 29.00 मिमी, खेड 43.42मिमी, दापोली 34.85 मिमी, चिपळून 33.88 मिमी, गुहागर-38.20 मिमी, संगमेश्वर 60.75. मिमी, रत्नागिरी 74.00 मिमी, लांजा 38.80 मिमी आणि राजापूर तालुक्या 44.62 मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.
बुधवारी सकाळपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र दुपार नंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली. पुढील चार दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 23 मे व 24 मे रोजी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका असे आवाहन प्रशासना मार्फत करण्यात आले आहे. आपत्ती काळात जिल्हा नियंत्रण कक्ष (02352) 222233 / 226248 किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 वर संपर्क करा. हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे.
या कालावधीत वीज चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनी चा वापर टाळावा. वीज चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. वीज चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. वीज चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाईल वर ‘दामिनी ॲप’ डाऊनलोड करून घ्यावे. पाऊस पडत असताना वीज चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये. मोबाईलवर संभाषण करु नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा. कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्ती काळातजिल्हा आपती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी 02352- 226248 /222233. व्हॉटसअप क्रमांक 7057222233, जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष 02352-222222. पोलीस टोल फ्री हेल्पलाईन 112. जिल्हा रुग्णालय 02352-222363. महावितरण, रत्नागिरी नियंत्रण कक्ष 7875765018. तहसिल कार्यालय रत्नागिरी 02352-223127, तहसिल कार्यालय लांजा 02351-230024, तहसिल कार्यालय राजापूर 02353-222027, तहसिल कार्यालय संगमेश्वर 02354-260024, तहसिल कार्यालय चिपळूण 02355-252044/9673252044, तहसिल कार्यालय खेड 02356- 263031, तहसिल कार्यालय दापोली 02358-282036, तहसिल कार्यालय गुहागर 02359- 240237, तहसिल कार्यालय मंडणगड 02350-225236 या क्रमांकाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.









