रत्नागिरी:- जिल्ह्यात शिक्षण सेवा वर्ग 1 अर्थात शिक्षणाधिकारी पदावर जवळपास गेल्या तीन वर्षांपासून एकच अधिकारी कार्यरत होते. सध्या कार्यरत असलेल्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनाही शिक्षण उपसंचालक (शिक्षण) समाजकल्याण आयुक्तालय पुणे या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. लवकरच या रिक्त पदावर पूर्णवेळ शिक्षण अधिकारी नियुक्ती केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रत्नागिरी जिल्हा राज्यातील शिक्षण विभागात अग्रेसर असणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत राज्यात कोकण विभागिय शिक्षण मंडळ स्थापनेपासून सतत अव्वल स्थानी राहिले आहे. या जिल्ह्यात शिक्षण विभागातील अधिकार्यांची अपवाद वगळता कायमस्वरुपी वानवा पहायला मिळते. शिक्षणाधिकारी पदाच्या तीन जागा जिल्ह्यासाठी मंजूर आहेत. जवळपास गेल्या तीन वर्षांपासून एकमेव शिक्षणाधिकारी जिल्ह्यात कार्यरत होत्या. निशादेवी वाघमोडे यांच्याकडे शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी प्राथमिक व शिक्षणाधिकारी निरंतर हे सर्व अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आले होते. राज्याच्या शाळेत शिक्षण व क्रीडा विभागाने प्रसिध्द केलेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ या पदांवर पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील सध्या कार्यरत असणार्या व जिल्ह्यातील शिक्षण सेवा वर्ग 1 च्या तिन्ही पदांचा कार्यभार सांभळणार्या शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांची निवड सुचीनुसार पदोन्नती करण्यात आली आहे. त्यामुळे सध्यातरी जिल्ह्यात कोणत्याही विभागात एकही शिक्षणाधिकारी कार्यरत नाही.