जिल्ह्यात महावितरणची चार नवी विद्युत उपकेंद्र कार्यान्वित; होणार विनाखंडीत वीजपुरवठा 

रत्नागिरी:- पालगड (मंडणगड), शिवणे (गुहागर), ओणी (राजापूर) आणि साडवली (संगमेश्वर) ही चार नवीन विद्युत उपकेंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्याने जिल्ह्यातील वीज पुरवठा विना खंडित सुरू राहील, अशी माहिती मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी दिली. तसेच पावसाळ्यात अखंडित पुरवठ्यासाठी आवश्यक सर्व मान्सून पूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश सर्व अधिकार्‍यांना दिले आहेत.

वादळी वारा, पावसामुळे वीज पुरवठा खंडित होतो. संभाव्य धोके टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना कराव्यात आणि साधन सामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावीत अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत. मागील वर्षी निसर्गचक्री वादळामुळे कोकणात वीज वाहिन्यांचे प्रचंड नुकसान झाले होते; परंतु महावितरण कंपनीने खंबीर पावले उचलून बाधित यंत्रणा रेकॉर्ड ब्रेक कालावधीत पुन्हा उभी केली होती. निसर्ग चक्रीवादळ, फयान वादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील वीज यंत्रणेला कमाचाही मोठा अनुभव मिळाला आहे. यामुळे यंदाच्या पावसाळी हंगामात किरकोळ घटना वगळता वीज पुरवठा सुरू राहील. गावखडी ते पावस ही स्वतंत्र नवीन पर्यायी वहिनी कार्यरत झाल्यामुळे पावसाळ्यात वीज पुरवठा अखंडित सुरू राहील. रत्नागिरी शहरातील भुमिगत वीज वाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर पावसाळी आणि वादळी हवामानातही सातत्यपूर्ण, सुरक्षित वीज पुरवठा सुरू राहण्यास अडचण येणार नाही. दुर्गम भागातील वाहिन्यांवर झुकलेल्या झाडे, फांद्या वेळीच साफ सफाई करण्यासाठी विशेष नियोजन केले आहे. अतितीव्र वारा आणि पावसामुळे वीज वाहिन्या तुटणे, त्यामुळे होणारे अपघात टाळणे शक्य होणार आहे. महावितरण कंपनीने आपली यंत्रणा जोमाने कामाला लावण्याचा निर्णय घेतला असून वीज ग्राहकांनी देखील या कामकाजासाठी काही काळ वीज पुरवठा बंद करावा लागल्यास सहकार्य करावे असे आवाहन श्री. सायनेकर यांनी केले.

रत्नागिरी शहरासाठी अखंडित वीजपुरवठा रहावा यासाठी 220 कीलोवॉट वाहिनीचे निवळी ते कूवारबाव दुपदरीकरण करण्याचे काम महापारेषण कंपनी लवकरच पूर्ण करणार आहे. त्यामुळे रत्नागिरी शहरासाठी भविष्यात पावसाळी वातावरणात वीज पुरवठा खंडित झाल्यास तीन विकल्प उपलब्ध राहतील.