रत्नागिरी:- जिल्ह्यातील नगर परिषद, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका महायुती म्हणूनच लढविल्या जात आहेत. रत्नागिरी नगर परिषद नगराध्यक्षपदाची उमेदवारी शिल्पा सुर्वे यांना देण्यात आली आहे. जनतेच्या मनातील उमेदवार महायुतीकडून देण्यात आला आहे. अर्ज दाखल करताना झालेल्या गदवरून शिल्पा सुर्वे यांचा विजय निश्चित झाल्याचा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
जिल्ह्यातील देवरूख नगरपंचायत नगराध्यक्षपद भाजपला देण्यात आले आहे. तेथे शिवसेनेची ताकद कमी आहे. उर्वरित सर्व ठिकाणी नगराध्यक्ष पदाची निवडणूक शिवसेना लढत आहे. रत्नागिरीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्यामुळे या जागेवर शिवसेनेतून शिल्पा सुर्वे, समृद्धी मयेकर, स्मितल पावसकर, वैभवी खेडेकर इच्छुक होत्या. या सर्वांची नावे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविण्यात आली होती. तर आपल्या उपस्थितीत चारही महिलांनी एकत्रितपणे शिल्पा सुर्वे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. जनतेच्या मनातही यांनाच उमेदवारी द्यावी असे होते. त्यानुसार पक्षाने शिल्पा सुर्वे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
नगरसेवक म्हणून शिल्पा सुर्वे यांनी दोन टर्म उत्तम काम केले आहे. शिक्षक असलेल्या शिल्पा सुर्वे यांनी नगरपालिकेत सभापती पदावर उत्तमरित्या काम केले आहे. तळागाळातील जनतेशी त्यांचा थेट संवाद आहे. पारदर्शक कारभार करणाऱ्या म्हणून त्यांची शहरात ओळख आहे. नऊ वर्षांनी होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी महिलेला संधी देताना पक्षाला आनंद होत असल्याचे श्री.सामंत यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढविली जाईल. पाच वर्षात शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नवा आराखडा तयार केला जाईल. वर्षभरात नगराध्यक्षांसहीत नगरसेवकांनी आपल्या कामाचा लेखाजोखा सादर केला पाहिजे. जो उत्तम काम करेल त्यालाच नगरसेवक पदावर राहण्याची संधी दिली जाणार असल्याचे श्री.सामंत यांनी सांगितले.
जिल्ह्यातील नगर परिषदा, नगरपंचायतींमध्ये महायुतीलाच यश मिळणार आहे. सर्वच ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वास श्री.सामंत यांनी व्यक्त केला.









