Wednesday, September 16, 2026
spot_img
Home रत्नागिरी जिल्ह्यात पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

जिल्ह्यात पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

ग्रामीण कृषी मौसम सेवाकेंद्राचा अंदाज

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात पुढील पाच दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारत हवामान विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या ग्रामीण कृषी मौसम सेवाकेंद्रातर्फे वर्तवण्यात आली आहे.
या कालावधीत आकाश ढगाळ राहून कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. तसेच ताशी १० ते १५ किमी वेगाने वारे वाहतील, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जिल्ह्यात सलग दोन दिवस तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. सोमवारी (ता. १४) रात्रीही जोरदार सरीं पडून गेल्या. परंतु त्यानंतर पुन्हा पावसाने विश्रांती घेतली. मंगळवारी दिवसभर जिल्ह्यात कधी ढगाळ वातावरण तर कधी कडकडीत ऊन अशी स्थिती होती; मात्र हवामान विभागाने पुढील पाच दिवस म्हणजेच २० सप्टेंबरपर्यंत हलका पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवली आहे. पावसाचा हा अंदाज लक्षात घेऊन कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या कृषी सूचना जारी केल्या आहेत. भातपिकामध्ये सध्या तुडतुडे, खोडकीड किंवा पाने गुंडाळणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेताची नियमित पाहणी करून आवश्यकतेनुसार योग्य ती फवारणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे. फळबाग उत्पादकांसाठी दिलेल्या सूचनेत आंबा आणि काजूच्या नवीन लावलेल्या कलमांना वाऱ्यापासून संरक्षण मिळण्यासाठी काठीचा आधार देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. झाडांच्या मुळाशी पाणी साचू देऊ नये आणि पालवीवर येणाऱ्या किडींवर वेळीच नियंत्रण मिळवावे. हवामानाची स्थिती पाहूनच खते देणे व फवारणीची कामे हाती घ्यावीत, असे आवाहन कृषी विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.