रत्नागिरी:- मागील दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात दिवस-रात्र कोसळणाऱ्या पावसामुळे प्रमुख नद्यांना पूर आला असून अनेक भागांत पडझड सुरू झाली आहे. रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा येथे मुख्य रस्ता खचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सध्या रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 862 मिमी पावसाची नोंद झाली असून, पावसाची सरासरी 95.87 मिमीवर पोहोचली आहे. या संततधार पावसामुळे खेड येथील जगबुडी नदी आता इशारा पातळीच्या उंबरठ्यावर आली आहे. जगबुडीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. दुसरीकडे, काजळी नदीची पाणी पातळी 12.79 मीटरवर गेली असून ती धोक्याच्या चिन्हाकडे सरकत आहे.
जिल्ह्यातील इतर जलवाहिन्यांचा विचार केला तर वशिष्ठी, शास्त्री, बावनदी, सोनवी आणि कोदवली नद्यांच्या पातळीतही हळूहळू वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत झालेल्या अतिवृष्टीमुळे राजापूर तालुक्यासह विविध ठिकाणी घरे आणि रस्त्यांची पडझड झाल्याचे वृत्त आहे. सर्वाधिक पावसाचा जोर किनारपट्टीच्या आणि डोंगराळ भागांत पाहायला मिळत आहे.
तालुकानिहाय आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत मंडणगड, गुहागर, दापोली आणि राजापूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. मंडणगड तालुक्यात 131.50 मिली मीटर, दापोली 103 मिमी, खेड 81.42 मिमी, चिपळूण 63 मिमी, गुहागर 108.40 मिमी, संगमेश्वर 60.41 मिमी, रत्नागिरी – 101.66 लांजा 99 मिमी आणि राजापूर तालुक्यात 114.50 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.
या आपत्कालीन परिस्थितीचा एक सकारात्मक पैलू ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. सतत कोसळणाऱ्या पाण्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी भात लावणीच्या कामांना वेग दिला आहे. मुबलक पाण्यामुळे खोळंबलेली शेतीची कामे आता पूर्ण वेगाने सुरू झाली असून, शेतकरी राजा शेतात गुंतल्याचे चित्र आहे.









