रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या अध्यक्षतेखाली सन २०२४ आणि २०२५ या वर्षांचा तुलनात्मक वार्षिक गुन्हे आढावा घेण्यात आला. या आढाव्यातून २०२५ मध्ये जिल्ह्यात गंभीर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट झाली असल्याचे समोर आले आहे. तसेच गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण आणि तांत्रिक प्रणालीतील कामगिरीमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली आहे.
रत्नागिरी पोलिसांनी शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये (खून, खुनाचा प्रयत्न) १०० टक्के गुन्हे उघडकीस आणण्याचा विक्रम कायम ठेवला आहे. मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांत (दरोडा, चोरी, घरफोडी) सन २०२४ मध्ये उघडकीस येण्याचे प्रमाण ४५.२० टक्के होते. २०२५ मध्ये हे प्रमाण वाढून ६६.४५ टक्के झाले आहे. एकूणच गुन्हे शाबितीच्या प्रमाणात 15 टक्के इतकी वाढ झाली आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत महिलांविषयक गुन्ह्यांमध्ये ०.८ टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच अपहरणाच्या ५८ केसेसपैकी ५३ मुला-मुलींचा शोध लावण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले. तसेच ५०८ बेपत्ता व्यक्तींपैकी ४२९ जणांचा शोध पोलिसांनी घेतला आहे. महिला कक्षाकडे आलेल्या ८९ तक्रारींपैकी ८८ जणांचे समुपदेशन करण्यात आले.
‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत अमली पदार्थ विरोधी कारवाईत मोठी झेप घेत पोलिसांनी ७५ केसेस दाखल केल्या आहेत. नुकत्याच कारवाईत १८१ किलोहून अधिक अमली पदार्थांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून मोठा साठा नष्ट करण्यात आला. याशिवाय अवैध दारूधंद्यांवर ८६५ आणि जुगार अडड्यांवर १४० केसेस करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात रत्नागिरी पोलीस दल वर्षभर सलग ३ ऱ्या क्रमांकावर राहिले आहे. २०२५ मध्ये २० सायबर गुन्हे उघड करून नागरिकांचे ५ लाख ६८ हजार ३१६ रुपये परत मिळवून दिले. जिल्ह्यात ‘रत्नसेतू’ चॅटबॉट, ‘रेड्स’ ॲप, ‘मैत्री’ ॲप आणि व्हॉट्सॲप चॅनेल यांसारख्या अत्याधुनिक साधनांचा वापर करून सेवा अधिक लोकाभिमुख केली जात आहे.









