जिल्ह्यात कोरोना बाधित बारा रुग्ण उपचाराखाली; पॉझिटिव्हीटी दर तीन टक्क्यांवर

रत्नागिरी:- कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्यामुळे जिल्हावासीयांची चिंतेत भर पडली आहे. सध्या १२ बाधित उपचाराखाली आहेत. मुंबईशी जिल्हावासीयांचा संपर्क अधिक असल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. सध्या जिल्ह्याचा पॉझिटीव्ह दर ३ टक्केवर पोचला आहे.

देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. तिसर्‍या लाटेनंतर रत्नागिरी जिल्हयातील बाधित संख्या शुन्यावर आली होती. मे महिन्यातही एकही बाधित नव्हता; परंतु जुन महिन्यापासून दररोज बाधित सापडू लागले आहेत. रविवारी (ता. १२) तपासण्यात आलेल्या १४३ अहवालांमध्ये ५ जणं बाधित आढळले असून २ जणं बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे एकुण बाधितांचा आकडा १२ आहे. त्यातील ९ जणं गृहविलगीकरणात असून १ संस्थात्मक विलगीकरणात आहे. सध्या मुंबईत जाऊन येणार्‍यांची संख्या वाढल्यामुळे बाधितांमध्ये दररोज भर पडत असल्याचे आरोग्य यंत्रणेचे मत आहे. राज्यात सर्वाधिक बाधित मुंबईत असून देशात महाराष्ट्रामध्ये अधिक संख्या आहे. केरळ दुसर्‍या क्रमांकावर आहे. बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणाही संतर्क झाली आहे.