मासेमारी हंगामाच्या पहिल्याच टप्प्यात बांगडा, टाईनी जाळ्यात
रत्नागिरी:- मासेमारीच्या नव्या हंगामाचा श्री गणेशा मच्छीमारांसाठी समाधानकारक झाला आहे. पहिल्या आठवड्यात मच्छीमारांच्या जाळ्यात फिशमिलच्या बांगडीसह मोठा बांगडा मासा, कोळंबी आणि काही प्रमाणात सुरमई मिळू लागली आहे. राज्याच्या हद्दी बाहेर मासेमारीची परवानगी असल्याने मच्छिमारांना मोठा संघर्ष करून मासेमारी करावी लागत असल्याने अवघे दोन टक्के मच्छीमार समुद्रात उतरले आहेत.
दोन महिने मासेमारी वरील बंदी कालावधी उठल्या नंतर जिल्ह्यात काही नौकानी मासेमारी करिता आपल्या नौका समुद्रात उतरवल्या. पावसाने देखील उसंत घेतल्याने मासेमारी साठी पोषक वातावरण तयार झाले. पहिल्याच टप्प्यात मच्छीमारांना चांगला रिपोर्ट मिळाल्याने मच्छीमारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ट्रॉलर्स्, गिलनेटने मासेमारी करणार्यांना बांगडा, कोळंबी आणि सुरमई मासा मिळत आहे. जाळ्यात सापडणार्या माशांमध्ये सर्वाधिक बांगडा या माशाचा समावेश आहे. ५० ते १०० डिश (एक डिश ३२ किलो) मासा मिळू लागली आहे.
यावर्षी राज्याच्या हद्दीत मासेमारी करण्यासाठी १५ ऑगस्ट पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या हद्दीत मासेमारी करण्यास मुभा आहे. पावसाने ओढ दिली असली तरी समुद्रातील वातावरण अद्यापही खवळलेले आहे. यामुळे हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच नौका समुद्रात आहेत.









