जिल्ह्यात आतापर्यंत ७४६ शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या

८६५ शिक्षकांची यादी ६ फेब्रुवारीला होणार प्रसिद्ध

रत्नागिरी:- शिक्षक बदलीच्या कार्यवाहीला मुहूर्त मिळण्यासाठी तब्बल तीन वर्षे लागली. शासनाच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेमुळे शिक्षकांचा फायदा झाला. घरबसल्या आणि कोणत्याही कार्यालयात न जाता बदली प्रक्रिया झाली आहे. आतापर्यंत ७४६ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. संवर्ग ४ मधील शिक्षकांच्या बदलीचे वेध लागले असून ८६५ शिक्षक यादीमध्ये आहेत. ही यादी ६ फेब्रुवारीला प्रसिध्द होणार आहे. तसेच पुढील प्रक्रीयेचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे.

तीन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया धिम्या गतीने का होईना सुरू आहे. आतापर्यंत शिक्षकांच्या संवर्ग एक ते तीनपर्यंतच्या बदली पात्र शिक्षकांची बदलीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता संवर्ग चारच्या बदल्या होणार असून या संवर्गात शिक्षकांची संख्या मोठी असल्याने तीन टप्प्यात या बदल्या होणार आहेत. याबाबतचे सुधारित वेळापत्रक ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवलेले आहे. कोविड संसर्गाचे दोन वर्षे आणि तिसरे वर्षे ऑनलाईन बदलीच्या प्रक्रियेत रखडल्यानंतर नोव्हेंबर २०२२ पासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदलीच्या प्रक्रियेला सुरूवात झालेली आहे. आतापर्यंत संवर्ग एक ते तीन यातील बदली पात्र ७४६ गुरूजीची बदली झालेल्या आहेत. आता संवर्ग चार ज्यात सर्वाधिक शिक्षकांची संख्या असून या शिक्षकांच्या बदलीसाठी अर्ज दाखल करण्यात येत आहेत. या संवर्गात तीन टप्प्यात शिक्षकांच्या बदल्या होणार असून यातील पहिल्या टप्प्यातील बदली पात्र शिक्षकांना ऑनलाईन प्रणालीत अर्ज दाखल करण्यासाठी २१ ते २६ जानेवारी दरम्यान मुदत होती. त्यानंतर ऑनलाई प्रणालीत २७ ते २ फेब्रुवारी संवर्ग चारच्या पहिल्या टप्प्यातील शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया होणार आहेत. त्यानंतर याच संवर्गातील दुसर्‍या टप्यातील शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया होणार असून यात पात्र शिक्षकांच्या बदलीच्या प्रक्रियेत विस्थापित होणार्‍या शिक्षकांना अर्ज करण्यासाठी २ ते ७ फेब्रुवारी दरम्यान मुदत राहणार आहे. त्यानंतर ८ ते १२ फेब्रुवारी दरम्यान, विस्थापित होणार्‍या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर बदली प्रक्रियेतील शेवटचा टप्पा म्हणजेच अवघड क्षेत्रातील रिक्त असणार्‍या सर्व शाळांमधील शिक्षकांच्या जागा भरण्यात येणार आहेत. यात सुगम क्षेत्रात १० वर्षे काम केलेल्या (अवघड क्षेत्राच्या बाहेर काम करणारे) शिक्षकांची यादी जाहीर करणे, आणि अवघड क्षेत्रातील बदलीची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर बदली झालेल्या सर्व शिक्षकांची यादी २३ फेब्रुवारीला प्रकाशित होणार आहे. संवर्ग ४ मधील ८६५ शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत.