जिल्ह्यातील 728 विद्यार्थ्यांना आरटीईच्या सोडतीची लॉटरी

रत्नागिरी:- शहरातील नावाजलेल्या शाळांमध्ये पाल्याला शिक्षण देण्याचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील पालकांचे स्वप्न पूर्णत्वास जात आहे. जिल्ह्यातील 92 शाळांमध्ये आरटीई प्रवेशासाठी 929 जागांसाठी 1 हजार 106 पालकांनी अर्ज सादर केले होते. यापैकी तब्बल 728 विद्यार्थ्यांना आरटीईच्या सोडतीची लॉटरी लागली आहे. सध्या तसे एसएमएस पालकांना पाठविण्यात येत आहेत. ज्या पालकांना एसएमएस आले नाहीत अशा पालकांना बालकांच्या प्रवेशासाठी आता प्राथमिक शिक्षण विभागाने पर्यायी संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. मात्र, प्रवेश घेवू इच्छिणार्‍या पालकांना सर्व्हर डाऊन असल्याने मनस्ताप सहन करावा लागला.

आरटीईनुसार खासगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना 25 टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या बालकांच्या अर्जातून ऑनलाइन सोडत काढण्यात आली. यामध्ये 94 हजार 700 बालकांची प्रवेश देण्यात आला. या सोडतीत प्रवेशासाठी पात्र असणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांना मोबाईलवर 12 एप्रिलपासून संदेश पाठविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या निवड यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी पालकांना बुधवारपासून ’एसएमएस’ जाण्यास सुरूवात झाली, परंतु दरम्यान आरटीई पोर्टलची तांत्रिक यंत्रणा कोलमडली.

आरटीई प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या बालकांच्या प्रवेशासाठी बुधवारी दुपारी 4 वाजल्यापासून पालकांना एसएमएस जाण्यास सुरवात झाली. पण प्रवेशाचे संकेतस्थळ बंद पडल्याने आपल्या पाल्याला प्रवेश मिळाला की नाही, हे पालकांना संकेतस्थळावर पाहता येत नव्हते. परिणामी पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण झाले. त्याची दखल घेत अखेर शिक्षण विभागाने प्रवेशाची माहिती पाहण्यासाठी पर्यायी संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे.