जिल्ह्यातील 42 ग्रामपंचायती टिबी मुक्त ग्रामपंचायती

रत्नागिरी:- जिल्ह्यातील 42 ग्रामपंचायतींना टीबी मुक्त ग्रामपंचायत म्हणून घोषित करण्यात आले आहे. केंद्र स्तरावरुन ही निवड करण्यात आली आहे. या सर्व ग्रामपंचायतींना बुधवारी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

सेंट्रल टीबी डिव्हीजन यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार महाराष्ट्रात 2250 ग्रामपंचायतींना पात्र ठरविण्यात आलेले आहे. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील 846 ग्रामपंचायतपैकी 42 ग्रामपंचायती टी.बी. मुक्त ग्रामपंचायती म्हणून पात्र ठरविण्यात आल्या. केंद्रीय स्तरावरुन प्राप्त पत्रातील मार्गदर्शक सुचनेनुसार संबंधित ग्रामपंचायतींना मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद रत्नागिरी येथे महात्मा गांधींच्या पुतळा स्मृतीचिन्हासह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यासोबत आरोग्याचे विविध कार्यक्रम व योजनांच्या माहिती पुस्तिका वितरीत करण्यात आल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी क्षयरोगाबद्दल सखोल माहिती देऊन गौरवपात्र ग्रामपंचायतीचे कौतुक केले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सेंट्रल टीबी डिव्हीजन, भारत सरकारने सन 2025 अखेर देशातून क्षयरोग दुरीकरणाचे ध्येय ठेवले आहे. याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायत स्तरावर क्षयरोगाशी निगडित समस्यांचे निराकरण करणे व क्षयरोग दुरीकरणासाठी पंचायतीमध्ये निरोगी स्पर्धा निर्माण करणे व त्यांच्या योगदानाचे जाहीर कौतुक करणे हे टी.बी. मुक्त ग्रामपंचायत उपक्रमाचे ध्येय आहे.

कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश सिरसाट, व्यवस्थापक फिनोलेक्स कंपनी श्रीदत्त अलगुर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुप करमरकर, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र रत्नागिरी डॉ. ज्योत्स्ना वाघमारे व जिल्हा क्षयरोग केंद्र रत्नागिरीचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा क्षयरोग केंद्राचे सांख्यिकी अन्वेषक तेजस पारपोलकर यांनी केले.
रत्नागिरी तालुक्यातील डोर्ले, अगरनरळ, बोंड्ये, काळबादेवी, भगवतीनगर, धामणसे, सैतवडे, गुंबाड, राजापूर तालुक्यातील जुवे जैतापूर, निवळी, मोगरे, झर्ये, वडवली, उपले, चिपळूण तालुक्यातील रिक्टोळी, खांडोत्री, कान्हे, परशुराम, मुंढे, दहिवली, करंबवणे, भिले, चिवेली. संगमेश्वर तालुक्यातील बोंड्ये, चिखली, आंबवली, वांद्री, पांगरी. गुहागर तालुक्यातील कुटगिरी, पाभरे, उमरठ. लांजा तालुक्यातील जावडे, माजळ, आसगे, आडवली. खेड तालुक्यातील मोहाने, खवटी, कशेडी, सातवगाव. दापोली तालुक्यातील वांजळोली, मंडणगड तालुक्यातील पालघर, पाले या ग्रामपंचायती टीबीमुक्त झालेल्या आहेत.