21- 22 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन, ग्रामदैवत मंदिरांवर होणार रोषणाई
रत्नागिरी:- अयोध्या येथे होणार्या श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठान सोहळ्यानिमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील 196 श्रीराम मंदिरात उत्सव साजरा केला जाणार असून जिल्ह्यातील 4,663 ग्रामदैवतांच्या मंदिरावर विद्युतरोषणाई करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
22 जानेवारी रोजी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठान सोहळ्यानिमित्ताने जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार्या कार्यक्रमांसाठी रत्नागिरी तालुक्यांसह जिल्ह्यातील विविध मंदिर विश्वस्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
हा उत्सव 21 व 22 जानेवारी असा दोन दिवस केला जाणार आहे. जिल्ह्यातील 196 राम मंदिरांमध्ये गीत रामायणांचा कार्यक्रम आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. जिल्ह्यातील नऊ प्रमुख शहरांमध्ये एलईडीवर अयोध्येतील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन नऊ ठिकाणी केले जाणार आहे.
राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापनेचा मुहुर्त 12.39चा असून1 मिनीट 23 सेकंदाचा असणार आहे. यावेळी जिल्ह्यातील श्रीरामाच्या सर्व मंदिरात आरती किंवा घंटानाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक श्रीराम मंदिरात तेथील विश्वस्तांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रत्नागिरी शहरात 22 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता शोभा यात्रा काढण्यात येणार असून यात विद्यार्थी व नागरिक सहभागी होणार आहेत. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात गीतरामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री 9 वा. फटाक्यांची आतषबाजी केली जाणार असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले. त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरांवर या दिवशी गुढी उभारावी असे आवाहनही त्यांनी केले. त्याचप्रमाणे शासकीय कार्यालयांवरही विद्युतरोषणाई केली जाणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला आमदार योगेश कदम यांच्यासह भाजपाचे लोकसभाप्रमुख प्रमोद जठार, भाजपा दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, अॅड. विलास पाटणे, किरण उर्फ भैया सामंत उपस्थित होते.









