जिल्ह्यातील २२ हजार ५७५ शेतकऱ्यांनी घेतले विमा कवच

रत्नागिरी:- आंबिया बहरातील आंबा, काजू फळपिक विमा योजनेला गतवर्षीच्या तुलनेत कमी प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २२ हजार ५७५ शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत असून, पुढील पाच दिवसांत अजून दहा हजार बागायतदारांनी विमा उतरवणे अपेक्षित आहे.

बदलत्या हवामानामुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर विपरित परिणाम होऊन उत्पादनात घट होते आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान स्वीकारावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामान धोक्यांपासून संरक्षण मिळावे आणि नुकसान झाल्यास भरपाई मिळण्यासाठी कृषी विभागामार्फत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राबवण्यात येते. त्यात रत्नागिरी जिल्ह्यात अधिसूचित केलेल्या ८३ महसूल मंडळातील आंबा व काजूपिकांच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण दिले जाते. या योजनेत कर्जदार व बिगरकर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक आहे तसेच खातेदार शेतकरीव्यतिरिक्त कुळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीही यांना योजना लागू आहेत; मात्र भाडेपट्टीने शेती करणाऱ्यास नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकरार पिकविमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. विमा योजना जाहीर झाल्यानंतर आठ दिवसात जिल्ह्यातील २ हजार ७९८ शेतकऱ्यांनी १ हजार ४१५ हेक्टर क्षेत्रावरील विमा उतरवला होता. सुरवातीला अल्प प्रतिसाद मिळाला होता. यंदा पाऊस उशिरापर्यंत सुरू राहिल्याने हंगाम लांबणीवर पडणार आहे. गेल्या काही दिवसात ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे वातावरणातील बदलाचा परिणाम आंब्यावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीपोटी १०० कोटीचा लांभाश सुमारे ३२ हजार बागायतदारांना मिळाला होता; परंतु परतावा जाहीर करण्यास विलंब झाल्यामुळे बागायतदारांनीही यंदा विमा उतरवण्यासाठी शेवटच्या टप्प्यात गर्दी केली होती. आतापर्यंत २२ हजार ५७५ शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. गतवर्षी इतक्या बागायतदारांनी विमा उतरवणे अपेक्षित आहे. त्यासाठी दहा हजार बागायतदार कमी पडत आहेत. विमा उतरवण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत आहे. या कालावधीत बागायतदारांनी विमा काढावा, असे आवाहन केले आहे.