रत्नागिरी:- जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर करताच पोलिसांनी त्याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये लॉकडाऊनची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याचा आधार घेतला आहे. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे जिल्ह्यातील प्रमुख शहरात बारीक लक्ष ठेवण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्याची अंमलबजावणी दि. ३ जूनपासून सुरू झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेला सुट देण्यात आली आहे. शहरात विविध ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. त्याचंबरोबर विविध भागांत पेट्रोलिंगही सुरू आहे.रत्नागिरी शहराची व्याप्ती पाहता शहरातील अंतर्गत मार्गावर लक्ष ठेवणे कठीण जात आहे. या छुप्या मार्गांचा वापर करून नागरिक घराबाहेर पडत आहेत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होण्यासाठी रत्नागिरी शहरात ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे. नागरिकांनी कितीही छुप्या मार्गाने घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर अशांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.पोलीस दलाकडुन वापरण्यात येणार्या ड्रोन कॅमेऱ्याचे रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, परिविक्षाधीन अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड, वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासने, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले, पोलीस नरेश नवले उपस्थित होते. रत्नागिरीत वापरण्यात आलेली पद्धत सम्पूर्ण जिल्ह्यातील शहरात वापरण्यात आली असून याद्वारे प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे.









