Friday, November 13, 2026
spot_img
Home रत्नागिरी जिल्‍ह्यातील डायलेसीस केंद्रे जिल्‍हा प्रशासन चालवणार

जिल्‍ह्यातील डायलेसीस केंद्रे जिल्‍हा प्रशासन चालवणार

ना. उदय सामंत; वर्षभराचा खर्च सीएसआर फंडातून उभारणार

रत्नागिरी:- जिल्‍ह्यातील पाच डायलेसीस युनिट कोणत्‍याही परिस्‍थिती बंद पडू देणार नाही. हे युनिट चालवणार्‍या एचएलएल कंपनीला ती युनिट चालवणे जमणार नसेल तर जिल्‍हा प्रशासन आरोग्‍य विभागाच्‍या माध्‍यमातून ही युनिट सुरु ठेवेल. या कंपनीला चालवायचे नसेल तर त्‍यांना जिल्‍ह्याबाहेर एक मशिनही हलवू देणार नाही अशी भूमिका पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्‍यक्‍त केली.
जिल्‍हा शासकीय रुग्‍णालयामध्‍ये डायलेसीस युनिट सुरु असून त्‍या ठिकाणी 1313 जणांचे डायलेसीस सुरु असून 11750 वेळा या रुग्‍णांनी डायलेसीस केलेले आहे. त्‍या व्‍यतिरिक्‍त जिल्‍हयात 5 ठिकाणी ग्रामीण रुग्‍णालयांमध्‍ये डायलेसीस युनिट सुरु करण्‍यात आले होते. मात्र गेल्‍या काही दिवसांपासून ही युनिट बंद होती. लांजा येथे असणारे युनिट आ. किरण सामंत यांनी केलेल्‍या प्रयत्‍नामुळे सुरु झाले आहे. ही युनिट चालवणारे एचएलएल कंपनीने आता आठ दिवसांची मुदत मागितली आहे. आठ दिवसानंतर त्‍यांना डायलेसीस युनिट चालवणे जमणार नसेल तर जिल्‍हा प्रशासन आरोग्‍य विभागाच्‍या मदतीने ही युनिट चालवेल. या युनिटच्‍या पगारासाठी वर्षभराचा खर्च सुमारे 30 लाखाच्‍या आसपास आहे. यासाठी सीएसआर फंडातून किंवा आऊटसोर्स करुन ही यंत्रणा सुरु केली जाईल. या खर्चासाठी काही फंड सीएसआरमधून उभारला जाईल असेही पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.
जिल्‍हयात असणारी ही पाचही युनिट कंपनीला चालवायची नसतील तर ती जिल्‍ह्याबाहेर नेऊ दिली जाणार नाहीत, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. या मशिनवर सद्या स्‍थानिक टेक्‍निशियन असल्‍याने त्‍याचा फायदा येथील रुग्‍णांना मिळेल असेही ना. सामंत यांनी स्‍पष्‍ट केले.
सिंधुरत्‍न योजनेच्‍या विकास कामांबाबत चर्चा करण्‍यात आली. आठ ते दहा कोटीची कामे निधी देऊनही झाली नव्‍हती ही कामे रद्द करण्‍यात आली असून, नवीन कामे केली जाणार असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. यापुढे येणारे सरसकट प्रस्‍ताव पहिल्‍यास्‍तरावर तपासले जातील, त्‍यानंतर छाननी करुन योग्‍य प्रस्‍ताव समितीकडे येऊन त्‍याबाबत निर्णय घेतला जाणार असल्‍याचेही ना. सामंत यांनी स्‍पष्‍ट केले.
जिल्‍ह्यात बचत गटांच्‍या महिलांना मायक्रोफायनान्‍स कंपन्‍यांकडून त्रास दिला जात असून जिल्‍हाधिकारी याबाबत सोमवारी बैठक घेणार आहे. त्‍यानंतर आपण स्‍वत: बैठक घेऊ असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले

रत्‍नागिरी न.प.चा घनकचरा प्रकल्‍प नसल्‍यानेच राष्‍ट्रीय पातळीवर पहिल्‍या क्रमांक हुकल्‍याचे ना. सामंत यांनी सांगितले. येथील घनकचरा प्रकल्‍पाची निविदा प्रक्रिया सुरु असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.