तिवरे, पणदेरी, बेर्डेवाडी, कोंडवाडीचा समावेश, गतवर्षीच्या तुलनेत पाऊसमान कमी
रत्नागिरी:- दोन महिन्यात पडलेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या ३ मध्यम प्रकल्पांपैकी एक आणि ६० लघु प्रकल्पांपैकी ४६ प्रकल्प १०० टक्के भरून वाहू लागले आहेत. गडनदी मध्यम प्रकल्पात यावर्षी पाणीसाठा कमी आहे. जिल्ह्यातील चार प्रकल्पात यंदा दुरुस्तीसाठी पाणी साठा कमी ठेवण्यात आला आहे.
जिल्ह्यात नातूवाडी, गडनदी आणि अर्जुना हे तीन मध्यम प्रकल्प आहेत. या तीनही प्रकल्पांचा एकूण निर्मितीसाठा ४६६.४२ दशलक्ष घनमीटर इतका आहे तर उपयुक्त साठा ४४४.१२ दशलक्ष घनमीटर इतका आहे. आतापर्यंत या तीनही धरणांमध्ये ३५१.३३ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. गतवर्षी या तीनही मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून एकूण ३६९.९२ इतका पाणीसाठा २३ जुलै अखेर होता. नातूवाडी प्रकल्पात गेल्या वर्षी उपयुक्त पाणीसाठा २०.२५ दशलक्ष घनमीटर होता. यंदा तो १८.३८ दशलक्ष घनमीटर आहे. गडनदी प्रकल्पात गतवर्षी उपयुक्त पाणीसाठा ६६.३८ दशलक्ष घनमीटर होता. यंदाही तेवढाच पाणीसाठा आहे, तर अर्जुना प्रकल्पात गेल्या वर्षी उपयुक्त पाणीसाठा ७२.५६ दशलक्ष घनमीटर इतका होता. शंभर टक्के साठा यंदाही आहे. नातूवाडी प्रकल्पात गेल्या वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा आहे. जिल्ह्यात ६७ लघुप्रकल्प असून त्यापैकी १६ लघुप्रकल्प पाटबंधारे विभागाचे आहेत. उर्वरित पाटबंधारे विभागाचे आहेत. त्या ६७ लघुप्रकल्पांपैकी चार प्रकल्पात यंदा साठा कमी करण्यात आला आहे. त्यात तिवरे, पणदेरी, बेर्डेवाडी, कोंडवाडी यांचा समावेश आहे. पणदेरी प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी आराखडा बनवण्याचे काम नाशिकच्या संस्थेला देण्यात आले आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. यंदा ६० लघुप्रकल्पांमध्ये पाणीसाठ्याचा संचय केला आहे. त्यापैकी ४६ धरणे पूर्णपणे भरलेली आहे. गतवर्षीही यावेळी ही धरणे १०० टक्के भरली होती. १ जूनपासून २४ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी १८५२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत २८६१ मिमी सरासरी नोंद झाली होती. तुलनेत कमी पाऊस झाला असला तरीही धरणांसाठी पूरक ठरला आहे.