रत्नागिरीः– जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ‘शोध कलारत्नांचा’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मदत करणार आहे. विद्याथ्यार्र्ंमधील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हापरिषदेने जे. जे. स्कुल ऑफ आर्टस्च्या मदतीने कार्यशाळांचे नियोजन केले आहे. त्यासाठी विद्यार्थी निवड केली जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा नियोजनकडे पाठवला आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी सांगितले.
नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्यावर अधिक भर दिला आहे. याचा अवलंब रत्नागिरी जिल्हापरिषदेने केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली शोध कलारत्नांचा हा नाविन्यपुर्ण उपक्रम राबविला जात आहे. जिल्हा नियोजनमधून याला निधी मिळणार असून तसा प्रस्ताव दिला आहे. कलाकरांचा शोध घेण्यासाठी पहिली ते बारावीच्या सर्व शाळांमध्ये कला क्षेत्राची आवड असलेल्या निवडक विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेतील जाईल. त्यामधून तालुकानिहाय प्रत्येक गटातून चार अशी १६ बक्षीसपात्र चित्रांची निवड केली जाईल. त्यासाठी जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्च्या तज्ञ परिक्षकांची मदत घेण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांबरोबरच बक्षीस न मिळालेले परंतु कलेचे विशेष कौशल्य असलेल्या काही निवडक विद्यार्थ्यांची कार्यशाळा होईल. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील पाच कला शिक्षक निवडण्यात येणार आहेत. हे शिक्षक ठरवून दिलेला कलाविषयक अभ्यासक्रम शाळांमध्ये राबवतील. कलेसाठी पूरक वातावरण निर्मिती करणे, चित्रांच्या इमेजचा संग्रह करणे, वेळोवेळी मागितलेली माहिती संबंधितांपर्यंत पोहचविणे व विद्यार्थी उपस्थिती नोंदविणे ही कामे शिक्षक करतील. वर्षभरात शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहा कार्यशाळा घेण्यात येतील. त्यातील दोन जिल्हास्तरावर तर चार तालुकास्तरावर होतील. यामध्ये ४५ मार्गदर्शक आणि बक्षीस पात्र १४४ विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्यांना लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य जिल्हा परिषद पुरवणार आहे.









