रत्नागिरी:- जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी हे पद गेले दीड महिना रिक्तच आहे. त्यांच्या जागी आता गुहागरचे गटविकास अधिकारी प्रकाश भोसले यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यात 845 ग्रामपंचायती आहेत. त्या सर्वांवर जिल्हा परिषदेत लक्ष दिले जाते; मात्र या विभागाचा खातेप्रमुखच गेले दीड महिना हजरच न झाल्याने कारभार चालवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दीड महिन्यापूर्वी मनिषा देसाई यांची बदली कोल्हापूर येथे झाली. त्यांच्या जागी कोल्हापूर जिल्हा परिषदेमधील उपमुख्य कार्यकारी अधिकारी भालेराव यांची नियुक्ती झाली होती. नियुक्ती होऊन दीड महिना झाला तरी भालेराव हे हजरच झालेले नाहीत. तसा अहवालही जिल्हा परिषद प्रशासनाने आयुक्त कार्यालयात पाठवला आहे; मात्र तोपर्यंत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अर्चना वाघमळे यांच्याकडे या पदाचा पदभार सोपवण्यात आला होता. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी याचाही पदभार असल्याने तीन पदभार सांभाळणे कठीण होऊन बसले होते. शेवटी ग्रामपंचायतींचा पदभार हा गुहागरचे गटविकास अधिकारी प्रकाश भोसले यांच्याकडे देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार सोमवारपासून भोसले यांच्याकडे हा पदभार आहे. ग्रामपंचायतीचा कारभार हा गुहागरमधून चालवला जाणार आहे. कारण त्यांच्याकडे नियमित गुहागर पंचायत समितीचा पदभार असणार आहे. वास्तविक शासनाने या महत्त्वाच्या विभागात नियमित अधिकारी नियुक्त करणे गरजेचे आहे. यामुळे एकंदरीत जिल्ह्याच्या गावविकास गाड्यावर याचा विपरित परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.









