रत्नागिरी:- नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गोव्याप्रमाणेच रत्नागिरीलाही पसंती वाढत असून, जिल्ह्यातील किनारे पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. अनेक पर्यटकांना रात्री हॉटेल मिळेनाशी झाल्याने त्यांचा हिरमोड होताना दिसत आहे. मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातून हजारो पर्यटक दाखल झाले. मंगळवारी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी रात्री उशिरा पर्यटकांनी समुद्रकिनारी हजेरी लावली होती.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर व रत्नागिरी तालुक्यातील समुद्रकिनार्यांना विशेषत: पर्यटकांची पसंती मिळाली आहे. मुंबई, पुण्यातील अनेक पर्यटक दापोली व गुहागरमध्ये दाखल झाले आहेत. तर पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक रत्नागिरी तालुक्यात दाखल झाले आहेत.
रत्नागिरीतील धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवलेल्या गणपतीपुळे हजारो पर्यटकांनी फुलून गेले आहे. रत्नागिरीतील नेवरे, आरेवारे, गणपतीपुळे, मालगुंड, गुहागर, वेळणेश्वर, दापोलीतील समुद्रकिनार्यांवर वॉटर स्पोर्टस सुरु असल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांचा ओढा अधिक आहे. रत्नागिरीतील नेवरे-काजिरभाटी येथे स्पीडबोटचा थरारक अनुभवाबरोबरच स्कुबा डायव्हींगची सुविधा असल्याने, पर्यटक त्याचा लाभ घेत आहे. आरेवारे येथे रिव्हर क्रॉसिंगला विशेष पसंती मिळत आहे.
गणपतीपुळे मंदिरासमोरील किनार्यांवर विविध वॉटरस्पोर्टस असल्याने याचठिकाणी अधिकाधिक पर्यटक थांबण्याला जास्त प्राधान्य देत आहेत. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे हॉटेल व लॉजिंगवरही ताण आला असून, अनेक पर्यटकांना राहण्यासाठी हॉटेलचा शोध घेताना दमछाक होताना दिसत आहे.
रत्नागिरीमध्ये आल्यावर शहर व परिसरात थोडे बदल दिसत असले तरी नवनवीन सुविधा असाव्यात, अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. भाट्येसह आरेवारे या ठिकाणी समुद्रात भिजल्यानंतर आंघोळीसाठी किंवा चेजिंग रुम असाव्यात, अशा भावनाही काही पर्यटकांनी व्यक्त केल्या. ओल्या कपड्यांवरच फिरावे लागत असल्याची खंतही काही पर्यटकांनी व्यक्त केली.









