Wednesday, May 27, 2026
spot_img
Home रत्नागिरी जयगड समुद्रात मत्स्यव्यवसाय विभागाची तीन एलईडी नौकांवर कारवाई

जयगड समुद्रात मत्स्यव्यवसाय विभागाची तीन एलईडी नौकांवर कारवाई

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यावर सुरू असलेल्या अवैध एलईडी मासेमारीविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने काल मध्यरात्री एक मोठी आणि धाडसी मोहीम फत्ते केली. जयगड बंदराच्या परिसरात तासाभराचा थरारक पाठलाग करून विभागाने ३ नौका रंगेहाथ पकडल्या आहेत. प्रतिकूल हवामान आणि उग्र लाटांचा सामना करत पार पडलेली ही मोहीम विभागासाठी एक ‘रेकॉर्डब्रेकिंग’ कारवाई ठरली आहे.

काही दिवसांपासून जयगड परिसरात रात्रीच्या अंधारात एलईडी लाईटचा वापर करून मासळीची लूट सुरू असल्याची गुप्त माहिती विभागाला मिळाली होती. गस्ती नौकेसाठी डिझेल उपलब्ध नसल्याच्या चर्चेमुळे अवैध मासेमार निर्धास्त झाले होते. मात्र, मत्स्यव्यवसाय विभागाने अत्यंत गुप्तपणे रणनीती आखली, तातडीने डिझेलची व्यवस्था केली आणि कोणतीही चाहूल लागू न देता गस्ती नौका जयगडच्या दिशेने वळवली.

मध्यरात्रीच्या गडद अंधारात आणि जोरदार वाऱ्यात ५ परवाना अधिकाऱ्यांच्या पथकाने समुद्रात झेप घेतली. कारवाईची चाहूल लागताच एका नौकेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने जिद्दीने समुद्रातील उग्र लाटांवर स्वार होत तब्बल १ तास पाठलाग करून त्या नौकेला वेढा घातला आणि शरण येण्यास भाग पाडले.

प्त करण्यात आलेल्या नौकांमध्ये एच. इम्तियाज (IND-MH-4-MM-1961) – मालक इम्तियाज हाजी हसनमिया मुकादम, लक्ष्मी (IND-MH-4-MM-506) – मालक: लीना लक्ष्मण बिरजे आणि अक्सा इम्रान (IND-MH-4-MM-1971) – मालक: अब्दुल लतीफ अली होडेकर यांचा समावेश आहे.

ही संपूर्ण कारवाई रत्नागिरीचे मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त श्री. सागर कुवेसकर यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत खालील अधिकाऱ्यांनी जीवाची बाजी लावत कारवाई पार पाडली. यामध्ये परवाना अधिकारी: चिन्मय जोशी (रत्नागिरी), पार्थ तावडे (साखरीनाटे), स्वप्नील चव्हाण (गुहागर), सौ. दीप्ती साळवी (दाभोळ), सौ. स्मितल कांबळे (जयगड) यांचा समावेश होता. तसेच सुरक्षा पथक कर्मचारी तुषार कर्गुटकर, विनायक शिंदे, सुजन पवार आणि साईनाथ साळवी हे देखील यावेळी उपस्थित होते.