जिंदालचे सहकार्य; कळझोंडी पंचक्रोशीतील
गावांना एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा
रत्नागिरी:- कळझोंडी धरणाची उंची वाढविण्याचे काम सुरू असल्यामुळे पंचक्रोशीतील गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. शनिवारी पालकमंत्री ना.उदय सामंत यांची पंचक्रोशीतील सरपंचांनी भेट घेऊन पाणीटंचाई दूर करण्याची विनंती केली होती. ना.सामंत यांनी याची दखल घेत बावनदी येथील धरणातून अतिरिक्त 20 लाख लिटर पाणी जिंदालच्या पाणी योजनेतून देण्याचा निर्णय घेतला आहे. टंचाईग्रस्त गावांना एक दिवसाआड 11 लाख लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.
कळझोंडी येथील धरणाची उंची वाढविण्यासाठी शासनाने 24 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. स्वस्तिक कन्स्ट्रक्शनने धरणाच्या कामाला सुरूवात केल्यामुळे धरणातील पाणीसाठा रिकामा करण्यात आला. त्यामुळे धरणावर अवलंबून असलेल्या गावांचा पाणीपुरवठा खंडीत झाला होता.
कळझोंडी धरणा व्यतिरिक्त अन्य पाण्याचा कोणताही स्त्रोत पंचक्रोशीतील गावांना उपलब्ध नाही. परंतु त्या गावाच्या हद्दीतून जिंदालला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन जाते. जिंदाल कंपनी प्रतिदिन बावनदी धरणातून 30 लाख लिटर पाणी उचलते. ना.सामंत यांनी एमआयडीसीमार्फत 20 लाख लिटर पाण्याचा अतिरिक्त पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यातून जिंदाल कंपनी प्रतिदिन 50 लाख लिटर पाणी उचलेल, त्यातील 11 लाख लिटर पाणी एक दिवसाआड पंचक्रोशीतील गावांना त्यांच्या नळपाणी योजनेद्वारे पुरवठा केला जाणार आहे.
बावनदी धरणात मे अखेर पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. अतिरिक्त पाणी पुरवठा केला तरीही पाणी साठ्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तर पाणी पुरवठा सुरळीत करून दिल्याबद्दल पंचक्रोशीतील सरपंचांसहीत ग्रामस्थांनी ना.उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.









