जमात-ए-इस्लामी हिंद ‘लेडीज विंग’तर्फे महिला दिनासह इफ्तार पार्टीचे आयोजन

रत्नागिरी:- स्थानिक हॉटेल व्यंकटेश एक्झिक्युटिव्ह आणि डायनिंग हॉल येथे जमात-ए-इस्लामी हिंद, ‘लेडीज विंग’च्या वतीने जागतिक महिला दिन आणि इफ्तार पार्टीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरीच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेल्या या विशेष इफ्तार पार्टीची शहरात मोठी चर्चा होत आहे.

​या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून रत्नागिरीच्या नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे उपस्थित होत्या. तसेच सायबर गुन्हे शाखेच्या हवालदार शेटे मॅडम आणि हवालदार कांबळे सर यांनीही विशेष उपस्थिती लावून महिलांना मार्गदर्शन केले. महिला दिनाचे औचित्य असल्याने शहरातील विविध क्षेत्रांतील महिला आणि नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

​कार्यक्रमाची सुरुवात कु. झोहा भोम्भल हिने पाहुण्यांचे स्वागत करून केली, तर समिना सुभेदार यांनी ‘तिलावत-ए-कुराण’चे वाचन केले. याप्रसंगी ‘लेडीज विंग’च्या प्रधान मॅडम यांनी जमात-ए-इस्लामी हिंदच्या सामाजिक कार्याची माहिती दिली आणि ‘इस्लाम आणि महिला’ या विषयावर प्रबोधन केले.

​नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी आपल्या भाषणात आयोजकांचे कौतुक करताना म्हटले की,
​”आमदार साहेबांमार्फत दरवर्षी इफ्तार पार्टी दिली जाते, परंतु महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेली ही रत्नागिरीतील पहिलीच इफ्तार पार्टी आहे, हा उपक्रम कौतुकास्पद आहे.”

​या सोहळ्यात गेल्या २२ वर्षांपासून योग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या हट्टयोग प्रशिक्षिका शर्मिला साने यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. हवालदार दुर्गा शेटे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शुभांगी तापेकर यांनी शर्मिला साने यांची ओळख करून दिली. साने मॅडम यांनी आपल्या भाषणात हट्टयोगाचे महत्त्व आणि आरोग्यासाठी त्याचे फायदे सांगितले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सायबर गुन्हे शाखेच्या दुर्गा शेटे आणि दशरथ कांबळे यांनी महिलांना ऑनलाईन फसवणुकीपासून कसे सावध राहावे, याचे सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थितांच्या मोबाईलमध्ये महत्त्वाचे ‘सेफ्टी लॉक’ आणि सेटिंग्ज करून दिल्या.

​कार्यक्रमाचे नेटके नियोजन लेडीज विंगच्या समीरा सुभेदार, मरियम भोम्भल, झीनत काझी, खदिजा प्रधान आणि शुभांगी तापेकर यांनी केले. सामा काझी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर खदिजा प्रधान यांनी आभार प्रदर्शन केले.

या प्रसंगी प्रीती सुर्वे, मेधा कुलकर्णी, वैभवी खेडेकर, रुकसार खान, आफरीन होडेकर, नाहिद सोलकर यांसह अनेक महिला मान्यवर उपस्थित होत्या. इफ्तारच्या वेळी सामूहिक प्रार्थना करून सर्वांनी एकत्र उपवास सोडला.