Tuesday, June 16, 2026
spot_img
Home राजकीय चिपळूण पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या सुर्यकांत खापले यांची निवड

चिपळूण पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या सुर्यकांत खापले यांची निवड

चिपळूण:- चिपळूण पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक बिनविरोध झाली. सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिंदेसेना व भाजपची युती झाली. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने सभापतीपदी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे सुर्यकांत खापले, तर उपसभापतीपदी शिंदेसेनेचे संदेश आयरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांनी काम पाहिले.

चिपळूण पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सोमवारी सभापती, उपसभापती निवडीचे आयोजन केले होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे, गटविकास अधिकारी सौ. उमा घार्गे पाटील, सहायक गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर उपस्थित होते. पंचायत समितीच्या १८ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला ७, शिंदेसेनेला ४, भाजपला ३ आणि ठाकरे सेनेला ४ जागा मिळाल्या होत्या. पंचायत समितीवर त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती. रविवारी महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महायुती म्हणून सत्ता स्थापन करण्याचे ठरले. राष्ट्रवादीच्या सात जागा असल्याने सुरवातीची अडीच वर्षे सभापदी पद राष्ट्रवादीला देण्याचे निश्चीत झाले. तर उपसभापतीपद युतीला देण्यावर शिक्कामोर्तब केले होते. त्यानुसार सोमवारी आमदार शेखर निकम, शिवसेनेचे उपनेते व माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजप जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण आदींच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. सभापतीपदासाठी राष्ट्रवादीकडून सुर्यकांत खेतले, उपसभापतीपदासाठी शिंदेसेनेचे संदेश आयरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या दोघांचेच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी सभापती म्हणून सुर्यकांत खेतले, उपसभापती म्हणून संदेश आयरे यांची निवड जाहीर केली. निवडीवेळी राष्ट्रवादीकडून माजी सभापती सौ. पूजा निकम, तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, शौकत मुकादम, दादा साळवी, दशरथ दाभोळकर, सौ. दिशा दाभोळकर, शिंदेसेनेचे उपनेते सदानंद चव्हाण, विनोद झगडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, यांच्यासह महायुतीचे सर्व सदस्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.