चिपळूण:- चिपळूण तालुक्यातून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये बेपत्ता झालेल्या दोन व्यक्तींचा अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. यातील एक इसम वालोपे येथून तर दुसरा इसम पेढे येथून बेपत्ता झाला आहे. संबंधित व्यक्तींविषयी काही माहिती मिळाल्यास तातडीने चिपळूण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
चिपळूण तालुक्यातील वालोपे देऊळवाडी येथील रहिवासी विनोद आयरे (वय ४७) हे ११ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास राहत्या घरातून अचानक नापत्ता झाले आहेत. याप्रकरणी सौ. विजया विनोद आयरे यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. मात्र, दीर्घ कालावधी उलटूनही त्यांचा शोध लागलेला नाही.
दुसऱ्या घटनेत, मूळचे पश्चिम बंगाल (कोलकाता) येथील रहिवासी असलेले रेंटा हांसदा (वय ३६, रा. फतेपूर कालीतला, जि. नादिया, पश्चिम बंगाल) हे पेढे (ता. चिपळूण) येथून गेल्या चार वर्षांपासून बेपत्ता आहेत. याबाबत शंकर शांती सरकार (सध्या रा. खेरशेत, ता. चिपळूण) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वरील वर्णनाचे इसम कोणाला आढळून आल्यास किंवा त्यांच्याबाबत काहीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ चिपळूण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









