लोको पायलटच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
रत्नागिरी:- कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या रो-रो सेवेतील एका ट्रकचा भार एका बाजूला सरकून तो कलंडल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. मात्र, लोको पायलटच्या प्रसंगावधनामुळे ही बाब वेळीच लक्षात आली आणि खेड रेल्वे स्थानकात गाडी थांबवून पुढील अनर्थ टाळण्यात यश आले.
शुक्रवार, २ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कोलाड येथून मडगावकडे मालवाहू ट्रक घेऊन जाणारी रो-रो गाडी धावत होती. प्रवासादरम्यान या गाडीवरील एका ट्रकचा लोड अचानक एका बाजूला सरकला, ज्यामुळे तो ट्रक रेल्वे वॅगनवर एका बाजूला कलंडला. चालत्या गाडीतून हा ट्रक खाली कोसळण्याची भीती निर्माण झाली होती.
गाडी चालवत असताना लोको पायलटच्या ही बाब लक्षात आली. ट्रक कलंडल्याचे दिसताच त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून खेड रेल्वे स्थानकात गाडी तत्काळ थांबवली. रेल्वे प्रशासनाला याची माहिती मिळताच सुरक्षा पथकाने तातडीने हालचाली सुरू केल्या.
घटनास्थळी रेल्वेचे तांत्रिक पथक दाखल झाले. ट्रकमधील माल पुन्हा व्यवस्थित लावून आणि सेफ्टी बेल्टच्या सहाय्याने ट्रक वॅगनला घट्ट बांधून सुरक्षित करण्यात आला. हे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. ट्रक पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतरच रो-रो सेवा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आली.
या घटनेमुळे कोकण रेल्वेवरील इतर प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे रेल्वे सूत्रांनी स्पष्ट केले. लोको पायलटच्या जागरूकतेमुळे मालवाहू ट्रक रेल्वे रुळावर पडण्यापासून वाचला, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती आणि रेल्वे वाहतूक तासनतास विस्कळीत झाली असती. रेल्वे प्रशासनाकडून लोको पायलटच्या या सतर्कतेचे कौतुक केले जात आहे.









