Wednesday, May 27, 2026
spot_img
Home राजापूर चालत्या रिक्षात हृदयविकाराच्या झटक्याने चालकाचा मृत्यू

चालत्या रिक्षात हृदयविकाराच्या झटक्याने चालकाचा मृत्यू

ओणी येथे रिक्षा उलटली, मात्र प्रवाशांना दुखापत नाही

राजापूर:- तालुक्यातील गोठणे दोनिवडे येथील रिक्षा व्यावसायिक ताजू वाडेकर (५५) यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ओणी येथे प्रवासी सोडण्यासाठी जात असताना त्यांना हृदयविकाराच्या झटका आला. चालत्या रिक्षातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान त्यांचे रिक्षावरील नियंत्रण सुटून रिक्षा उलटली. मात्र सुदैवाने प्रवाशांना दुखापत झाली नाही.

गोठणे दोनिवडे येथील रहिवासी असलेले वाडेकर पूर्वी फ्रिज मेकॅनिक म्हणून परदेशात नोकरीला होते. मात्र गावाकडच्या ओढीने काही वर्षांपूर्वी ते परतले. सुमो आणि रिक्षाच्या माध्यमातून त्यांनी केवळ व्यवसाय केला नाही तर माणसे जोडली. नेहमी उलटी टोपी घालण्याच्या त्यांच्या अनोख्या शैलीमुळे ते संपूर्ण पंचक्रोशीतं ‘उलटी टोपी’ याच नावाने ओळखले जात. त्यांचा मनमिळावू मिश्कील स्वभाव आणि मदतीला धावून जाण्याची वृत्ती यामुळे ते पंचक्रोशीत ओळखले जात. गोठणे दोनिवडे-राजापूर या मार्गावर ते आपला व्यवसाय करीत. या मार्गावरील शालेय मुलांना ते मोफत सेवा देत.

रात्री-अपरात्री कोणाचीही हाक असो, वाडेकर आपली गाडी घेऊन हजर असायचे. शेवटपर्यंत ‘प्रवासी सेवा” हीच ईश्वर सेवा मानून जगले. मंगळवारी ओणी येथे प्रवासी सोडायला जात असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांचे रिक्षावरील नियंत्रण सुटून रिक्षा उलटली. मात्र सुदैवाने प्रवाशांना दुखापत झाली नाही. ओणी येथील रिक्षा व्यवसायिकांनी त्यांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कोणत्याही प्रवाशाची अडचण ती आपली अडचण समजून ते व्यवसायापलीकडे मदत करत असत. आपल्या जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी प्रवासी सेवेला प्राधान्य दिले. ही गोष्ट निश्चितच आदर्शवत होती. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.