रत्नागिरी:- गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या उत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या लाखो चाकरमान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील महामार्ग, मुख्य चौक आणि रेल्वे स्थानकांवर मिळून एकूण १६ तपासणी नाक्यांवर आरोग्य पथके तैनात करण्यात आली असून ही पथके १० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत अहोरात्र कार्यरत राहणार आहेत.
कोकणात दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. या काळात मुंबई, ठाणे आणि इतर भागांतून लाखोंच्या संख्येने चाकरमानी आपल्या गावी येतात. सध्या पावसाचे दिवस असल्याने व वातावरणात वारंवार बदल होत असल्याने जिल्ह्यात सर्दी, ताप, डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. या साथीच्या पार्श्वभूमीवर परगावाहून येणाऱ्या चाकरमान्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना गरजेनुसार त्वरित प्राथमिक उपचार दिले जाणार आहेत. परतीच्या प्रवासातही ही तपासणी सुरूच राहणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या सर्व ठिकाणी पेंडॉल (तपासणी केंद्रे) उभारण्यात येत आहेत.
तालुकानिहाय आरोग्य तपासणी नाक्यांची ठिकाणे:
आरोग्य विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, खेड तालुक्यात एकूण ३ ठिकाणी तपासणी नाके असतील; यामध्ये भरणे नाका (पेंडॉल), दाभीळ फाटा (पेंडॉल) आणि खेड रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. चिपळूण तालुक्यात सर्वाधिक ६ ठिकाणी पथके तैनात करण्यात आली असून यात पेढे सवतसडादर्शन (पेंडॉल), कळंबस्ते तिठा (पेंडॉल), बहादुरशेख नाका (पेंडॉल), चिपळूण रेल्वे स्टेशन, अलोरे घाटमाथा (चेकपोस्ट) आणि दहिवली फाटा (पेंडॉल) या ठिकाणांचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे संगमेश्वर तालुक्यात २ ठिकाणी पथके असणार असून संगमेश्वर एस.टी. स्टॅण्डजवळील पुलाखाली (पेंडॉल) आणि देवरूख मुर्शी (चेकपोस्ट) येथे तपासणी केली जाईल. रत्नागिरी तालुक्यात २ ठिकाणी नाके उभारण्यात आले असून हातखंबा तिठा (पेंडॉल) आणि रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे आरोग्य पथक तैनात असेल. लांजा तालुक्यात २ ठिकाणी पथके कार्यरत असणार असून वेरळ (पेंडॉल) आणि कुवे गणपती मंदिरासमोर (पेंडॉल) येथे चाकरमान्यांची तपासणी होईल. तर राजापूर तालुक्यात १ ठिकाणी म्हणजेच राजापूर एस.टी. स्टॅण्ड (पेंडॉल) येथे आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे.
“कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची आरोग्य तपासणी करून आजारी व्यक्तींवर वेळीच प्राथमिक उपचार केले जातील, जेणेकरून सणादरम्यान आरोग्य विषयक समस्या उद्भवणार नाहीत,” अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.









