ग्रामपंचायतीमधील सभा, बैठकांचे इतिवृत्त चावडीवर जाहीर करा 

राज्य शासनाचे नव्याने आदेश

रत्नागिरी:- ग्रामपंचायतीत झालेल्या मासिक सभा, महिला सभा, वॉर्ड सभा, ग्रामसभा व बैठकांच्या इतिवृत्त ग्रामपंचायत चावडीच्या समोर फलकावर जाहिरपणे प्रसिध्द करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.

ग्रामसभा व मासिक सभेत झालेल्या निर्णयानुसार ग्रामपंचायतीकडून विकासकामांवर निधी खर्च करण्यात येतो. अनेकदा सभेत निर्णय न होताही कामे होत असतात, तर काही सरपंच व ग्रामसेवक इतिवृत्तात मनमानी तपशील घालण्याचा प्रकार घडत असल्याचे राज्य शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे राज्यशासनानेच यासाठी आता पुढाकार घेत ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करीत आहे.

बैठकीस किंवा सभेस उपस्थित असलेल्या सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्या इतिवृत्तावर स्वाक्षर्‍या घेण्यात याव्यात, ग्रामसभेच्या इतिवृत्तावरही ग्रामस्थांच्या स्वाक्षरी घेण्यात याव्यात. इतिवृत्त एकीकडे व स्वाक्षरी एका रजिस्टरमध्ये घेण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश राज्य शासनाने दिले आहेत. असा प्रकार दिसून आल्यास ते इतिवृत्त अनअधिकृत ठरविण्यात येणार आहेत. दि. 1 एप्रिल 2014 पासून घेण्यात आलेले सर्व ग्रामसभा, मासिक सभा, महिला सभा, वॉर्ड सभा, विविध समित्यांच्या बैठकीच्या सूचना व इतिवृत्त विहित नमुन्यात ग्रामस्थांच्या माहितीसाठी ग्रामपंचायतीच्या फलकावर लावण्यात यावेत, असे आदेश ग्रामविकास खात्याने दिले आहेत.
त्यानुसार ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडून कार्यवाही करण्यात, येणार की यात टाळाटाळ होणार, याची उत्सुकता नागरिकांत आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे लाभार्थी, नागरिकांसह अन्य यंत्रणेला याचा फायदा होणार आहे. यामुळे माहितीही मिळण्यास मदत होणार आहे.

ग्रामविकास खात्याने ग्रामपंचायतीच्या सर्व सभांचा इतिवृत्त ग्रामपंचायतीच्या चावडीवर प्रसिध्द करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशाचे अजूनही कोणत्याच ग्रामपंचायतीत पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.