Saturday, August 15, 2026
spot_img
Home रत्नागिरी गोळप येथे सहावीतील विद्यार्थ्याचा नदीत बुडून मृत्यू

गोळप येथे सहावीतील विद्यार्थ्याचा नदीत बुडून मृत्यू

रत्नागिरी:- मित्रासोबत नदीत पोहण्यासाठी गेलेल्या सहावीतील १२ वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (१३ ऑगस्ट) सायंकाळी गोळप पंचशीलनगर येथे घडली. आर्यन संतोष पालकर असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेने गोळप परिसरावर शोककळा पसरली आहे.

गोळप पंचशीलनगर येथे राहणारा आर्यन पालकर हा सहावीच्या वर्गात शिकत होता. गुरुवारी नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर तो सायंकाळी घरी आला. त्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मित्र सार्थक पालकर याच्यासोबत तो घराजवळील नदीवर पोहण्यासाठी गेला.

पोहण्यादरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने आर्यन पाण्यात बुडू लागला. आपला जीव वाचवण्यासाठी त्याने आरडाओरड केली. त्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने नदीकडे धाव घेतली. नागरिकांच्या प्रयत्नांनंतर सुमारे साडेसहा वाजण्याच्या सुमारास आर्यनला पाण्याबाहेर काढण्यात आले.

त्यानंतर त्याला तातडीने रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रात्री सुमारे ९.२० वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेची नोंद पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. अवघ्या बारा वर्षांच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाल्याने पालकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गोळप परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.