रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात गोखले नाक्यावरील दीपक स्टोअर्सच्या बाजूला बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या एका ४२ वर्षीय व्यक्तीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुनील महादेव डिंगणकर (रा. मधलीवाडी, भोंबार, पाचेरीसडा, भातगाव, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सुनील डिंगणकर हे गोखले नाक्याजवळ बेशुद्ध अवस्थेत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय (सिव्हील हॉस्पिटल), रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले.
मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रुती बोडके यांनी २३ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. याप्रकरणी मृताच्या पत्नी सोनाली सुनील डिंगणकर यांनी दिलेल्या खबरेवरून रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.









