गॅस तुडवड्याची अफवा; एजन्सी बाहेर पोलिस बंदोबस्त तैनात

रत्नागिरी:- शहरात सध्या घरगुती गॅस सिलिंडरच्या तुटवड्याची जोरदार अफवा पसरली असून, यामुळे सामान्य ग्राहकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गॅस बुकिंगसाठी होणारा विलंब आणि अनिश्चिततेमुळे आज रत्नागिरीतील प्रसिद्ध ‘शांतादुर्गा गॅस एजन्सी’ बाहेर ग्राहकांनी अक्षरशः झुंबड केली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी एजन्सीच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

गॅस पुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याने ग्राहकांच्या चिंतेत भर पडली आहे. पूर्वी एकदा सिलिंडर बुक केल्यानंतर साधारण २५ दिवसांत दुसरे सिलिंडर उपलब्ध होत असे. मात्र, आता हा कालावधी ग्रामीण भागात थेट ४५ दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. तब्बल दीड महिन्यांचा ‘वेटिंग पिरियड’ वाढल्याने, “पुढचे सिलिंडर वेळेवर मिळेल की नाही?” या भीतीने नागरिक गॅस एजन्सीवर धाव घेत आहेत. ऐन कामाच्या वेळी गॅस संपल्यास चूल कशी पेटवायची, या विवंचनेत सामान्य गृहिणी अडकल्या आहेत.

वाढत्या गर्दीमुळे एजन्सी कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येत असून, संतप्त ग्राहकांशी होणारी वादावादी टाळण्यासाठी पोलिसांनी ताबा घेतला आहे. पोलीस कर्मचारी रांगा शिस्तीत लावण्यासोबतच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी घटनास्थळी तैनात आहेत. गॅस सिलिंडरसाठी पोलिसांच्या उपस्थितीत रांगा लावण्याची वेळ रत्नागिरीकरांवर आल्याने शहरात या विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे. एकीकडे गॅसचा तुटवडा जाणवत असला, तरी नागरिकांनी घाबरून न जाता संयम राखावा आणि अफवांना बळी पडू नये, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, ४५ दिवसांचे हे ‘वेटिंग’ कधी कमी होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.