रत्नागिरी:- राज्यातील एलपीजी गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर जहरी टीका केली आहे. “देशात कशाचाही तुटवडा नाही असे सांगता, मग बंद झालेले केरोसीन पुन्हा रेशनवर देण्याची वेळ का आली?” असा सवाल करत जाधवांनी सरकारला कोंडीत पकडले आहे.
सध्याच्या गॅस आणि इंधन टंचाईच्या परिस्थितीवर बोलताना भास्कर जाधव यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला. “सध्याच्या एलपीजी टंचाईला पंडित नेहरू आणि उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, असे अद्याप तरी भाजपने म्हटले नाही, त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत,” अशा शब्दात त्यांनी उपरोधिक टोला लगावला. अफवा पसरवण्यात भाजपचा हात कोणीही धरू शकत नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे कोरोनासारखी परिस्थिती उद्भवू शकते असे सांगतात, तर दुसरीकडे राज्यातील नेते सर्व काही सुरळीत असल्याच्या बढाया मारतात, असे सांगत जाधवांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. “जर इंधनाचा तुटवडा नाही, तर मग रेशनिंगवर केरोसीन देण्याचा निर्णय का घ्यावा लागला? यावरूनच राज्यातील परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्ट होते,” असे ते म्हणाले.
केवळ इंधन टंचाईच नव्हे, तर देशात वाढणाऱ्या अंधश्रद्धेसाठी आणि भोंदूगिरीसाठीही भास्कर जाधव यांनी भाजपला जबाबदार धरले. “२०१४ पासून देशात अघोरी विद्या आणि बुवाबाजीला ऊत आला आहे. राजकारणी लोकच जेव्हा बाबा-बापूंच्या पाया पडतात, तेव्हा सर्वसामान्य जनतेमध्ये चुकीचा संदेश जातो. राजसत्ता आणि धर्मसत्ता यांची गल्लत झाल्यामुळे विवेकाचा अंत होत आहे,” अशी टीका त्यांनी अशोक खरात प्रकरणाच्या संदर्भात केली.
काँग्रेसच्या काळात साडेतीनशे रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर आता बाराशे रुपयांवर पोहोचला आहे. महागाई गगनाला भिडलेली असतानाही भाजपवाले केवळ टीका करण्यात मग्न आहेत, असेही जाधव यांनी नमूद केले.









