गुहागर समुद्रकिनाऱ्यावर अचानक तेलाच्या लाटा

गुहागर:- गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर चार भागांत तेलाचा तवंग आढळून आला आहे. आठ दिवसांपूर्वीही असाच तवंग दिसला होता. मात्र, आजतागायत या तवंगाबाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने कार्यवाही केलेली नाही. काल प्रदूषण मंडळाचे अधिकारी अजय चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘आमच्याकडे याबाबत तक्रार आलेली नाही. तवंगाचे काही नमुने तपासासाठी न्यावे लागतील. त्यानंतरच याबाबत बोलणे उचित ठरेल.’

बाजारपेठ ते वरचापाट मोहल्ला या परिसरात चार ठिकाणी तेलाचा तवंग असलेल्या लाटा दिसतात. आठ दिवसांपूर्वी केवळ वरचापाट परिसरातील एकाच भागात या लाटा दिसत होत्या. यावेळी तेलाच्या तवंगाचे प्रमाणही जास्त आहे. याबाबत तहसीलदार लता धोत्रे म्हणाल्या की, ‘स्थानिकांकडून या विषयाची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर प्रदूषण मंडळाला या संदर्भात माहिती देण्याच्या सूचना मी दिल्या आहेत.’

चव्हाण म्हणाले, ‘आठ दिवसांपूर्वी एकदा याबाबत चर्चा ऐकली होती. हा तवंग कशामुळे येतो, याची माहिती घेतली पाहिजे. मागे तवंग आला तेव्हा आम्ही चौकशी केली. त्यावेळी आरजीपीपीएल व्यवस्थापनाला कळवले होते. मात्र, कोणतीच तक्रार न आल्याने हा विषय थांबला. आता पुन्हा तवंग येत असल्याने वरिष्ठांशी याविषयी बोललो आहे.’

तपासणी अहवालातून हा तवंग ऑईल, ग्रीस किंवा अन्य कोणता आहे ते समजेल. त्यानंतर तो कोठून आला याचीही माहिती घ्यावी लागेल. जिल्ह्यातील अन्य समुद्रकिनाऱ्यावर असा तवंग आढळत आहे का, याची माहिती घेण्यास सुरवात केली आहे. त्यानंतरच काय कार्यवाही करायची हे ठरवता येईल.